साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव साहित्यकारांच्या यादीतून वगळले..! सर्व पक्ष, संघटनांकडून निषेध, तहसीलदारांना निवेदन सादर

– अख्तर काझी


दौंड : प्रख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव भारतातील प्रसिद्ध प्रबोधनकार, साहित्यकारांचे यादीत समाविष्ट न करता केंद्र शासनाने अण्णाभाऊंच्या महान कार्याला, त्यांच्या साहित्याला, एकत्रित महाराष्ट्राच्या लढ्याला अपमानास्पद आणि अत्यंत छोटे लेखले जाण्याचे कृत्य करण्यात आले आहे याचा दौंड मधील सर्व पक्ष,संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशनला निषेधाचे निवेदन देण्यात आले. आबासो. वाघमारे, नागसेन धेंडे, सचिन कुलथे, विनायक माने, नरेश डाळिंबे, यादवजाधव, रामेश्वर मंत्री, सोमनाथ आगलावे, अमित मोरे, सागर कांबळे आदि उपस्थित होते.
अण्णाभाऊंचे कार्य जगविख्यात असून कष्टकरी कामगार व सर्वसामान्यांच्या श्रमाचा गौरव करताना, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे या त्यांनी मांडलेल्या संकल्पनेची प्रशंसा संपूर्ण जगात झाली आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊंचे मोलाचे योगदान आहे. गोवा, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करावीत म्हणून शाहिरीच्या डफावर थाप मारून संपूर्ण महाराष्ट्र जागृत करणाऱ्या अण्णा भाऊंना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरवण्याचा विचार सर्व समाज मनातून प्रकट होत असताना केंद्र शासनाने जातीयवादी मानसिकतेतून, थोर व प्रसिद्ध प्रबोधनकार व्यक्तींचा गौरव करण्यासाठी व त्यांनी केलेल्या कार्याला प्रसिद्धी देणे कामी जी यादी तयार केली जाते त्या यादीत अण्णाभाऊंचे नाव समाविष्ट न करून त्यांच्या महान समाजकार्याला कमी लेखले आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.
अण्णाभाऊंचे नाव सदरच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे व ज्यांनी अण्णाभाऊंचे नाव वगळण्याचे काम केले आहे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.