दौंड / केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे डुकरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. या मोकळ्या डुकरांच्या वाढत्या संख्येने येथील नागरिक भयभीत झाले असून लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून ज्या कोणी ही डुकरे येथे आणून सोडली आहेत ती त्यांनी त्वरित पकडून त्याचा अन्यत्र बंदोबस्त करावा किंवा प्रशासनाने ही मोकळी जनावरे पकडून योग्य ठिकाणी सोडावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
केडगाव स्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती असून या इमारतींमधील लहान मुले खेळण्यासाठी बाहेर मोकळ्या मैदानात गेल्यानंतर तेथे ही डुकरे इकडून तिकडे पळताना दिसतात तसेच लहान मुले, वृद्ध नागरिक मोकळ्या जागेत फिरत असताना त्यांच्यावर या डुकरांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.