बारामती : जिल्हा परिषद शाळेतील कॉम्प्युटर, मुलांची भांडी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

बारामती : वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मुढाळे ता.बारामती या गावच्या हद्दीतमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेची
घरफोडी करून त्यातून कॉम्प्युटर स्क्रीन, शालेय पोषण आहारातील मुलांची भांडी व इतर साहित्य चोरी करण्यात आले होते.
या बाबत दिनांक १२/१२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक माहिती घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मुढाळे ता.बारामती, जि.पुणे गावच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेची
घरफोडी ही आरोपी राजेंद्र जाधव व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून केली असल्याची माहिती मिळाली होती.
सदरची माहिती मिळताच पथकाने राजेंद्र जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे शाळा घरफोडी बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची घरफोडी ही त्याचे साथीदारांसोबत केले असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे या गुन्हयातील आरोपी १) राजेंद्र मारुती जाधव, (वय २८ वर्षे, रा.मुढाळे ता. बारामती जि.पुणे) २) लक्ष्मण मल्हारी सकाटे, (वय ३१ वर्षे, रा.मुढाळे, ता.बारामती, जि.पुणे) ३) राहुल वसंत सकाटे, (वय २० वर्षे, रा.मुढाळे, ता.बारामती, जि.पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याचे कबूल केले.
या आरोपींविरूध्द वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन गु.र.नं. ३४४/२०२१, भा.द.वि. कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्पुटर स्क्रिन्स व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहा पोलिस निरीक्षक संदिप येळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा आसिफ शेख, पोना अभिजित एकशिंगे, पोना स्वप्निल अहिवळे, पोहवा राजापुरे यांनी केली आहे.