Finance company agent fraud : फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटने लावला 30 बचत गटांना चूना! वसुली एजंट विरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : शहर प्रतिनिधी

फायनान्स कंपनीमध्ये वसुली एजंटने हजारो रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वतंत्र मायक्रोफिन फायनान्स कंपनीचे एरिया मॅनेजर तेजस डहाके (रा. अकलूज तालुका माळशिरस) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी राजू तुकाराम सोनकांबळे (रा.रूही, कंदार,जि. नांदेड) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे कंपनी व्यवहाराच्या देखरेखीचे काम करतात. दि.13 जुलै रोजी गोपाळवाडी (ता.दौंड) येथील कंपनी कार्यालयातील व्यवहाराची तपासणी करीत असताना फिर्यादी यांना कंपनीच्या वसुली एजंटने दि.22 मे ते 19 दरम्यान पैशाचा अपहार केला असल्याचे लक्षात आले. 

दौंड तालुक्यातील तसेच शिरूर, श्रीगोंदा येथील महिला बचत गटाच्या 13 महिला ठेवीदारांनी आरोपी राजू सोनकांबळे याला ऑनलाइन स्वरूपात त्याच्या खात्यामध्ये कर्जाच्या हप्त्यांचा भरणा केला तर उर्वरित 20 ठेवीदारांनी आरोपीकडे रोख स्वरूपात कर्जाच्या हप्त्यांचे पैसे दिले. 

असे एकूण 30 महिला बचत गटांच्या ठेवीदारांनी आरोपीकडे तब्बल 86 हजार 157 रु. जमा केले. आरोपीने हे पैसे कंपनीकडे जमा न करता स्वतःसाठी खर्च केले आहेत त्यामुळे आरोपीने या पैशांचा अपहार केला आहे हे लक्षात आल्याने सोनकांबळे विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. 

दौंड पोलिसांनी राजू सोनकांबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.