पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या सुडबुद्धितून टाकण्यात आल्या आहेत असा आरोप करत आज पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता ज्यामध्ये पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे व इतर महिला पदाधिकारी सामील झाले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनात तर भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील काऊन्सिल हॉलमध्ये अजित पवार आले होते त्यावेळी हॉल समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांचा सहभाग उल्लेखनीय राहिला.
राज्यात यापुढे भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचा आक्रमक गट तयार होऊन राजकीय वातावरण तप्त होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.