दौंड : जर कुणी एखाद्याचा जीव वाचवला, त्याला जीवदान देण्यात मोलाचे सहकार्य केले तर ती व्यक्ती अश्या माणसाचे उपकार मरेपर्यंत विसरत नाही. पण काही ठिकाणी असेही पहायला मिळते की ज्याने उपकार केले तो उपकार करून विसरून गेला मात्र ज्यावर उपकार केले तो मात्र उपकाराची फेड अपकाराने करत ज्याने उपकार केले त्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न करतो याला आपल्या गावरान मराठी भाषेत ‛ मालकाचे मीठ माजूरी’ असे म्हणतात.
असाच काहीसा आंखोदेखी किस्सा एका नागरिकाने कथन केला आहे. आणि मीठ कसे माजूरी असते याचे उदाहरण दिले आहे. बातमीची हेडलाईन वाचून दौंडचे आमदार आणि ज्यांना लोकांनी आरोग्यदूतांची पदवी बहाल केली आहे त्यांचे मीठ माजूरी निघाले हे वाचून तुम्ही थोडे चक्रावून जाल आणि म्हणाल की तुम्ही हे काय लिहिताय, काय म्हणताय पण दुर्दैवाने हे खरे आहे आणि पुढील बातमी वाचून तुम्ही नक्कीच यावर प्रतिक्रिया द्याल…
तर त्या नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलेला किस्सा असा की, कोविडच्या दुसऱ्या लाटेत ज्यावेळी सर्वत्र हाहाकार माजला होता, रुग्णांना कुठेही रेमडीसीविर, प्लाझ्मा मिळत नव्हते. प्रत्येक ठिकाणी वेटिंग आणि हकालपट्टी पाहायला मिळत होती. अश्या कठीण प्रसंगी एक कोविड रुग्ण दवाखान्यात दाखल झाला. त्या रुग्णाला डॉक्टरांनी अर्जंट रेमडीसीविर इंजेक्शन हवे असल्याचे सांगितले. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून नियमावली तयार केली होती. त्यामुळे पैसे असूनही रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी होत्या. मात्र ही बाब त्या रुग्णाच्या एका दूरच्या नातेवाईकाने दौंडचे आमदार राहुल कुल यांना सांगत विनंती केली आणि सूत्रे वेगाने हलवून त्या रुग्णाला गरजेच्यावेळी इंजेक्शन उपलब्ध झाली. आता हे होत असताना अचानक पुन्हा त्या रुग्णाला प्लाझ्मा ची गरज पडली. रुग्णालयात ऍडमिट असणारा रुग्ण हा घरातील कर्ताधर्ता असल्याने कुणाला काहीच सुचत नव्हते. मात्र याहीवेळी आमदार राहुल कुल आणि त्यांची संपूर्ण टीम मदतीला धावून आली आणि त्यांनी आपला सर्व जोर लावून पुण्यातून दोनवेळा प्लाझ्मा उपलब्ध करून त्या रुग्णाला जीवनदान देण्यात मोलाची भूमिका बजावली.
हे सर्व होत असताना जो नातेवाईक या रुग्णासाठी पळत होता त्यास दौंडचे आमदार राहुल कुल हे दररोज फोन करून रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस करत होते, तसेच काहीही गरज पडली तरी त्वरित फोन कर, संकोच करू नको असे म्हणून धीर देत होते. हे सर्व होत असताना त्या रुग्णाच्या घरातील व्यक्तींना एक वेगळाच अनुभव येत होता तो म्हणजे जे लोक तो रुग्ण चांगला असताना कायम त्या रुग्णाच्या सानिध्यात असायचे, हालचाल विचारायचे, ते मात्र सर्व गायब झाले होते. कोविड झाल्यानंतर आणि परिस्थिती बिकट बनल्यानंतर कोणता नेता, गावपुढारी त्याच्या परिवाराला हुंगुणही विचरत नव्हता मात्र अश्या कठीण समयी एक व्यक्ती त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कम उभी होती ती म्हणजे दौंडचे आमदार राहुल कुल… योग्यवेळी झालेले इलाज, औषोधोपचार या सर्वांच्या सहकार्याने काही दिवसानंतर तो रुग्ण बरा झाला आणि मृत्यूच्या धाडेतून बाहेर निघून नवीन जीवन घेऊन आपल्या घरी परतला.
आता हा किस्सा त्या नागरिकाने सांगितल्यानंतर पुढील जो विषय सांगीतला तो मात्र विचार करायला लावणारा असाच आहे.. कारण तो रुग्ण बरा झाला त्यावेळी त्याकडून आमदारांचे आभार मानायचे राहुन गेले मात्र ज्या नातेवाईकाने मध्यस्ती करून आमदारांना औषधोपचारांसाठी मदत माघीतली होती त्याने त्यांचे मनापासून आभार मानले. हे होत असताना काही महिन्यांनंतर तो रुग्ण मागचे घडलेले सर्व विसरून आमदार साहेबांच्या विरोधी ताफ्यात सामील झाला. पण असो शेवटी भारताच्या संविधानाने सर्वांना हा हक्क दिलेला आहे की त्याने कोणता निर्णय घ्यावा! पण तो बरा झालेला रुग्ण नुसता विरोधी ताफ्यात सामीलच झाला नाही तर त्याने आमदार साहेबांच्या तालुका पातळीवरील एका विशेष समाजाच्या लोकांमध्ये असणारे त्यांचे वलय नष्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनसुबा जाहीर करत पदांच्या हव्यासापोटी एक दिलदार व्यक्ती जी त्याच्या अतिषय कठीण समयी त्याचे मागे भक्कमपणे उभी राहिली तिच्या उपकाराची फेड अपकाराने जेली असल्याचे त्या नागरिकाने सांगितले आणि खरंच आमदार साहेबांचे मीठ माजूरी आहे की काय अशी शंका ऐकणाऱ्यांनाही येऊ लागली.
याबाबत आम्ही आमदार राहुल कुल यांना हा किस्सा खरा आहे का आणि तुमचे मीठ माजूरी असल्याचे जे बोलले जातेय ते खरे आहे का असे विचारले असता, मला दौंडच्या जनतेने निवडून दिले आहे, त्या जनतेची कामे करणे, त्यांच्या सुखदुःखात त्यांना साथ देणे हे माझे कर्तव्यच आहे. कोण कुठे जातो आणि कोणत्या पक्षाचा आहे हे मी मदत करताना, त्यांची कामे करताना कधी पाहत नाही. प्रत्येकाला त्याने कुठे जावे आणि काय करावे याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे आम्ही मदत करताना ‛माणुसकी’ या नात्याने प्रत्येकाला मदत करतो आणि अडचणीच्यावेळी प्रत्येकाला मदत करणे हा आपला धर्म आहे असे मी मानतो. त्यामुळे मीठ माजूरी वगैरे या गोष्टींवर मी लक्ष देत नाही आणि तसे कधी मानत ही नाही असे त्यांनी सांगितले.