दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील सरगर मळा, वाघमोडे वस्ती, शेख वस्ती येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून याबाबत बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडणवर यांनी वन विभागाला माहिती देऊन येथे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे उद्या याठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून सरगर मळा येथे बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. या परिसरात आणि शेतांमध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले असून त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत.
वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील सरपंच सुनील सोडणवर यांनी केली असल्याने उद्या याठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे.