दौंड मधील प्रसिद्ध व्यापाऱ्यास लुटले, मोठी रक्कम लंपास!

दौंड : दौंड मधील किराणा मालाच्या प्रसिद्ध व्यापाऱ्यास येथील संभाजी चौकात लुटले असल्याची घटना घडली आहे. या व्यापाऱ्याची या घटनेत मोठी लूट झाली असल्याची चर्चा होत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार दि.6 डिसेंबर रात्री 10.15 ते 10.30 वा. दरम्यान येथील संभाजी चौक (गोवा गल्ली) मध्ये असणारे आपले किराणा मालाचे (होलसेल) दुकान बंद करून हे व्यापारी दुकानातील दिवसभरातील व्यवहारांची रोकड (अद्याप रक्कम समजली नाही) घेऊन जवळच असलेल्या आपल्या घराकडे पायी निघाले होते. ते दुकानातून येथील संभाजी चौकात आले असता पाठीमागून आलेल्या युवकांनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. हे युवक बॅग घेऊन गोवा गल्ली रस्त्यावरून तुकाई नगरकडे पळाले. चोरटे साधारणतः 20 ते 25 वयोगटातील असल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात गर्दी जमा झाली.

दरम्यान दौंड पोलिसांनाही घटनेची खबर देण्यात आली. दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व परिसरामध्ये चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. या व्यापाऱ्यांच्या दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दौंड पोलीस चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याने सुखेजा यांच्या बॅगमध्ये नेमकी किती रक्कम होती हे समजू शकलेले नाही, मात्र सुखेजा यांची मोठी रक्कम चोरट्यांनी लंपास केली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.