बारामती : बारामती शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणाऱ्या दोघांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 30 पोती तांदूळ आणि एक चारचाकी वाहन असा 1 लाख 68 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पो.ना. दशरथ कोळेकर यांनी आरोपी वसंत सोमनाथ पोटे (रा.खटिक गल्ली बारामती), वैभव भारत दनाने (रा. तांदुळ वाडी रोड बारामती) यांच्या विरोधात फिर्याद दिली असून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात गरजूंना वितरित होणारा तांदूळ आरोपींनी खरेदी करून तो खुल्या बाजारात चढया भावाने विक्रीकरिता खाजगी पोत्यामध्ये भरून विनापरवाना मालवाहतूक गाडी क्र. MH 42 AQ 5805 TATA ACE हिच्यामध्ये रेशनिंगचे मालाची विक्री करण्याचे उदेशाने घेवून जात असताना ते पोलिसांना मिळून आले. यामध्ये 18 हजार रुपये किंमतीची 1200 किलो वजनाची तांदूळाने भरलेली एकूण 30 पोती व खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली 5 पोती, 1 लाख 50 हजारांची मालवाहतूक करणारी फिक्कट पिवळया रंगाची गाडी क्र. MH 42 AQ 5805 TATA ACE, असा एकूण 1 लाख 68 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.