दौंड : महिलेला फेरफटका पडला महागात, घरातून 5 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने केला लंपास

दौंड : यात्रेकरिता घरी आलेले नातलग पुन्हा आपल्या गावी परतले आणि घरात आपण एकटेच असल्याने महिला फेरफटका मारण्याकरिता बाहेर गेली आणि चोराने हाच डाव साधून महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा 5 लाख 80 हजाराचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना दौंड मधील भवानीनगर परिसरात घडली.

सुनंदा महादेव साळुंके(रा. श्रीनाथ कॉम्प्लेक्स, भवानीनगर, दौंड) यांनी याप्रकरणी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली, पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, दि.25/11/2021 रोजी सदरची घटना घडली आहे. यात्रेकरिता फिर्यादीच्या घरी त्यांचे नातलग आलेले होते. यात्रा संपल्याने ते आपल्या गावी परतले. त्यामुळे फिर्यादी घरी एकटेच होत्या. सायंकाळी साधारणतः 6 वा. च्या दरम्यान फिर्यादी घराला कुलूप लावून फेरफटका मारावयास बाहेर पडल्या, अर्ध्या तासाने फेरफटका मारून त्या घरी परतल्या असता त्यांना आपल्या घराचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचा दिसला.

घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते व सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने गायब झाले होते, त्याच प्रमाणे शेजारील खोलीतील लाकडी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सुद्धा त्यांना मिळून आली नाही. फिर्यादी यांनी तात्काळ त्यांच्या मुलास फोन करून ही घटना सांगितली, मुलगा ठाण्याहून परतल्या नंतर त्यांनी दौंड पोलिसांकडे तक्रार दिली. चोराने घरातील सोन्या, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम व पॅन कार्ड असा एकूण 5 लाख 79 हजार 400 रु. चा ऐवज लंपास केला आहे. पोलीस उप निरीक्षक गोसावी पुढील तपास करीत आहेत.