रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीवर अंकुश लावणार, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांचे प्रतिपादन

दौंड : रेल्वे हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर प्रतिबंध आणणे, घडलेल्या गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करून संबंधित आरोपींना अटक करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून जास्तीत जास्त चांगले काम करण्यावर लोहमार्ग पोलीस प्रशासन भर देत आहे असे लोहमार्ग पोलीस, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी सांगितले. गणेश शिंदे यांनी आज (दि.25) दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन ला भेट देत येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, रेल्वे कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच दौंड -पुणे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश शिंदे म्हणाले, पोलीस अधीक्षक वायसेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. रेल्वे प्रवास करताना जर प्रवाशाबरोबर एखादी अनर्थ घटना घडली तर त्या प्रवाशाची तक्रार गाडीतच घेतली जाते जेणेकरून प्रवाशाच्या प्रवासात खंड येत नाही.24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या लोहमार्ग पोलिसांनाही उत्तम सोयी, सुविधा मिळाव्यात यासाठी ही प्रयत्न आहे, असेही शिंदे म्हणाले. रेल्वे कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड रेल्वे हद्दीमध्ये नव्याने झालेल्या कॉर्ड लाईन स्टेशन परिसरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत तक्रारी केल्या, या परिसरामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली जात आहे, त्यांचेवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे गणेश शिंदे म्हणाले. येथील रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस या दोन्ही प्रशासनामध्ये समन्वय आणून येथील गुन्हेगारीवर अंकुश ठेवला जाईल असेही गणेश शिंदे म्हणाले.