दौंड मध्ये वाळू माफियांचा हैदोस पुन्हा सुरू..! नदीपात्रातून हायड्रोलिक- फायबर बोटीने केला जातोय बेकायदेशीर बेसुमार वाळू उपसा

अख्तर काझी


दौंड : दौंड तालुक्यातील शिरापूर,मलठण, वाटलुज गावाच्या हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळू माफिया राजरोसपणे दिवस-रात्र बेकायदेशीर वाळू उपसा करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. वाळू माफिया नदीपात्रातून वाळू उपसा करताना हायड्रोलिक तसेच फायबर बोटींचा वापर करीत असल्यामुळे नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Video – दौंडमध्ये वाळू माफिया पुन्हा सक्रिय..

मध्यंतरी वाळू माफियांचा हा गोरख धंदा बंद पाडण्यात प्रशासनाला थोडेफार यश आले होते. मात्र वाळू माफिया नदीपात्रातील प्रशासनाच्या वाळूवर पुन्हा डल्ला मारू लागले आहेत. वाळू माफियांचा नदीपात्रातील हैदोस रोखण्याचे मोठे आव्हान आता पुन्हा एकदा महसूल व पोलीस प्रशासनापुढे आले आहे. मलठण गावातील भीमा नदी पात्रामधून वाळू उपशासाठी फायबर, सेक्शन बोटींचा वापर होत आहे तर शिरापूर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी तर वाळूमाफियांनी फायबर सह हायड्रोलिक बोटच आणली असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. या बेसुमार होत असलेल्या वाळू उपशामुळे व बेकायदेशीर होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अशा भावना सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

महसूल व पोलिस प्रशासनाकडून या वाळू माफियांवर कारवाई होताना त्यांच्या यांत्रिक बोटीना जलसमाधी दिली जाते मात्र या बोटींच्या मालकांवर प्रशासनाचा जरब बसेल अशी कारवाई होत नसल्यामुळे हे वाळू माफिया प्रशासनाला न जुमानता पुन्हा पुन्हा याच धंद्यात सक्रिय होताना दिसतात, त्यामुळे अशा बोटींच्या मालकांना मोठी जेल यात्रा घडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत असे बोलले जात आहे .