साहेब… शहरातून जाणाऱ्या जड वाहनांचे काहीतरी करा! दौंड शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासनाला विनंती

दौंड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भिमनगर या मुख्य रस्त्यावर सध्या अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम चालू आहे. अनेक अडथळे पार पाडल्यानंतर काम प्रगती पथावर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे डॉ.आंबेडकर चौक ते भंगाळे हॉस्पिटल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे दौंड पोलीस स्टेशन शेजारील रस्त्यापासून पुढे हुतात्मा चौक ते आंबेडकर चौक रस्त्यावर वाहतुकीचा ताण कमालीचा वाढलेला आहे. अशा परिस्थितीतही शहरात येणारी व शहरातून बाहेर जाणारी जड वाहने याच मार्गावरून नेली जात आहे. या तिन ही ठिकाणी जड वाहने वळविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच या रस्त्यांवर दुतर्फा दुचाक्या लावल्या जात असल्यामुळे तर जड वाहन चालविणाऱ्या चालकांचा कसच लागत आहे. अनेक वेळा या वाहन चालकांचे स्थानिकांशी वाद होत आहेत, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. एखादी मोठी अनर्थ घटना घडण्या अगोदरच या जड वाहनांना शहरातून तूर्त तरी वाहतुकीसाठी मनाई करण्यात यावी अशी विनंती शहरातील नागरिक, व्यापारी वर्गाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे. जड वाहनांसाठी शहरातील मुख्य रस्त्या व्यतिरिक्त सुद्धा पर्यायी रस्ता उपलब्ध असताना या शहरात कोणीच काही बोलत नसल्याने ही जड वाहने शहरातूनच दामटली जात आहेत. शहरातील अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम पूर्ण होईल पर्यंत तरी जड वाहनांना शहराबाहेरील पर्यायी असलेला रस्ता वापरण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने कराव्यात अशी अपेक्षा दौंडकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.