दौंड : सकाळी साधारण 10 वा. ची वेळ, कोईमतुरहुन मुंबईला जाणारी कुर्ला एक्सप्रेस गाडी दौंड स्थानकातून निघताना एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन घाईतच स्थानकावर आली. परंतु गाडी तोपर्यंत निघतच होती त्यामुळे त्या आईला आपल्या मुलाला घेऊन चालती गाडी धरावी लागली.
आणि या गडबडीत गाडी चढताना तिच्याबरोबर असलेला मुलगा पाय घसरून रेल्वे स्थानक व ट्रॅकच्या मधल्या पोकळीमध्ये जाऊ लागले. आपला मुलगा गाडीखाली जात असल्याचे पाहून आईने आरडाओरडा केला. हे ऐकून स्थानक गस्तीवर असलेले लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक टिंगरे व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस कर्मचारी केदार यांनी तात्काळ त्या डब्याकडे धाव घेतली व प्रसंगावधान दाखवीत जोखीम पत्करत गाडीखाली जात असलेल्या मुलाला अलगदपणे उचलून त्याला कोणतीही दुखापत न होऊ देता बाहेर काढले.
यावेळी उपस्थित प्रवाशांनीही त्यांना मदत केली. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने त्या ठिकाणी धाव घेतल्याने मुलाचे प्राण वाचले अशा प्रतिक्रिया उपस्थित प्रवाशांनी यावेळी दिल्या. मुलाचे प्राण वाचविणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रवासी व पोलीस अधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे.