अख्तर काझी
दौंड : भुवनेश्वर हून मुंबईकडे जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून अंदाजे 24 हजार रु.किमतीचा आठ किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशन चे सहा. पो. निरीक्षक युवराज कलकूटगे यांनी दिली.
चित्तरंजन माझी व पपून रामचंद्रन प्रधान (दोघे रा. धनंजयापूर, गंजाम, उडिसा) हे दोघे प्रवासी कोणार्क एक्सप्रेस मधील B/06 बोगीतुन प्रवास करीत होते. कुर्डूवाडी स्टेशन सुटल्यानंतर त्या प्रवाशांची हालचाल संशयास्पद असल्याचे, रेल्वे सुरक्षा बलाचे पो. कर्मचारी जवळकोटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच या प्रवाशांच्या बाबत रेल्वे कंट्रोलला माहिती दिली. कोणार्क एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकात येताच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक तेजप्रकाश पाल व लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उप. निरीक्षक सुडगे, सहाय्यक फौजदार शिंदे व सहकारी पोलिसांनी सदर बोगीतील त्या संशयित प्रवाशांना गाडीखाली उतरवून त्यांची चौकशी केली, त्यांच्याकडे आठ किलो ग्रॅम वजनाची, अंदाजे 24 हजार रू. किमतीची गांजाची चार पाकिटे सापडली. त्या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी गुन्हा कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.