मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिकांच्या परिवारातील कंपनीने जमीन घेतली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील टीकेला आपण दिवाळी नंतर उत्तर देणार असून लवंगी फटाके फोडण्याऐवजी मी बॉम्ब फोडतो असा इशारा त्यांनी दिला होता.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्या परिवाराची असणारी सॉलिडस या कंपनीने 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा खास माणूस असणाऱ्या सलीम पटेल यांच्याकडून गोवा कंपाउंड नावाची पावणेतीन एकर जमीन ही खरेदी केली असल्याचा दावा केला आहे.

ही जमीन नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याने घेतली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ही जमीन एकदम कमी भावात घेतल्याचे त्यांनी सांगत ज्या एलबीएस रोड भागात ही जमीन आहे तीच्या मागे जी जमीन होती ती 415 रु स्क्वेअर फूट ने घेतली गेली आणि जी जमीन रस्त्याला लागून आहे ती मात्र 25 रुपये चौरस फुटाणे घेतली असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांनी बोलताना मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन विकत घेण्याची काय गरज होती. शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन घेतली, या लोकांनी ही जमीन इतक्या कमी भावाने का घेतली, टाडा आणि बॉम्ब स्फोटातील आरोपीची पॉवर ऑफ अटर्निने घेतलेली जमीन ही यांनी का घेतली, ती सरकार जमा व्हायला हवी होती असा सवाल उपस्थित करून काळा पैसा देऊन किंवा त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून ही जमीन घेतली आहे का, याबाबत मी सीबीआय, ईडी, यांसह सर्वांकडे ही कागदपत्रे देणार असल्याचे आणि शरद पवारांकडेही एक प्रत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजून माझ्याकडे चार प्रॉपर्टीचे मी कागदपत्र असून मी तेही जमा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे नेमके संबंध काय आहेत हे प्रश्न विचारला असता संपूर्ण रामायण सांगितल्यानंतर रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारताय.. असा सवाल त्यांनी मीडियाला केला.

तर तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होता त्यावेळी याबाबत काही ऍक्शन का घेतली नाही असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता. फडणवीस यांनी हा व्यवहार 2005 ला झाला आहे. माझ्या अगोदरही अनेक गृहमंत्री झाले आहेत. ते का गप्प होते, त्यांनी कारवाई का केली नाही असा प्रति सवाल त्यांनी मीडियाला करून या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिली.
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना आता नवाब मलिक कसे उत्तर देतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.