दौंड : खा सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे मानले जाणारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे दौंड शहराध्यक्ष प्रशांत उर्फ सोनू धनवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
धनवे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात काहीच ऑल इज वेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख यांचा राजीनामा व पुन्हा घरवापसी प्रकरण ताजे असतानाच आता धनवे यांनी तालुका अध्यक्षांकडे आपला राजीनामा देऊन पक्षाला आणखीन एक धक्का दिला आहे. पक्षाने गेल्या अनेक वर्षापासून धनवे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविली होती परंतु काही खाजगी अडचणीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रामध्ये नमूद केले आहे.
आपण नक्की कोणत्या कारणासाठी राजीनामा देत आहोत याबाबत प्रशांत धनवे यांनी आमच्या प्रतिनिधीकडे धक्कादायक खुलासा केला आहे. धनवे यांनी सांगितले की, दौंड पोलीस प्रशासन मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना ठरवून टारगेट करीत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या हस्ते शहरात एका मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमामध्ये मी पक्षाच्या काही नगरसेवकांबरोबर जात असताना माझ्या तोंडाला मास्क लावलेला नाही म्हणून दौंड पोलीस निरीक्षकांनी मला अडवून मास्क लावण्यास सांगत अपमानास्पद वागणूक दिली.
घटना पक्षाच्या नगर सेवकांसमोर झाली असताना तसेच मी ही बाब पक्षाचे तालुकाध्यक्ष यांना कळवून देखील याबाबत कोणीच काही दखल घेत नाही असे दिसत असल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे असे धनवे यांनी सांगितले.
प्रशांत धनवे यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा ते आरोप करत आहेत. परंतु याविरोधात पक्षातील कोणीच आवाज उठविताना दिसत नाही, त्यामुळे सच्या कार्यकर्त्यावर झालेला हा अन्याय आहे अशा प्रतिक्रिया पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. घरवापसी आधी बादशहा शेख यांनी पक्षावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते की काय! असेही कार्यकर्ते आता म्हणू लागले आहेत.
धनवे यांनी पोलीस प्रशासनावरील केलेल्या आरोपाबाबत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले की मी राष्ट्रवादी किंवा अन्य कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना टारगेट करीत आहे हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. मी धनवे यांना अपमानास्पद वागणूक दिलेली नाही. पवार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जात असताना धनवे यांनी तोंडावर मास्क लावलेला नव्हता हे दिसल्याने मी त्यांना थांबवून मास्क लावण्यास सांगितले एवढेच.
विनोद घुगे (पोलीस निरीक्षक, दौंड)