नवाब मलिक मुर्दाबाद-समीर वानखेडे जिंदाबाद, नातेवाईकांची रॅली काढून घोषणाबाजी.. अरे नेमकं हे प्रकरण चाललंय तरी कुठे..!

मुंबई : एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी आर्यन खान (aryan khan) यावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली आणि त्यांच्या या कारवाईला बोगस म्हणत नावब मलिक (nawab malik) यांनी विविध पुरावे दाखवत समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.


या प्रकरणात जसजसे दिवस उलटू लागले आहेत तसतशी यातील रंगत जास्तच वाढताना दिसत आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्या बचावासाठी एक-एक जण पुढे येऊ लागला.
अगोदर त्यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti redekar) ही पुढे आली, त्यानंतर त्यांची बहीण, वडील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, किरीट सोमय्या हे पुढे आले आणि त्यांनी आपापल्या माहितीप्रमाणे मीडियाला माहिती दिली.

हे सर्व होत असताना काल-परवा एका संघटनेने एनसीबी (NCB) ऑफिस समोर आंदोलन करत समीर वानखेडे यांचा सत्कार केला तर नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या. (हा सत्कार स्वीकारण्यासाठी समीर वानखेडे तेथे आले हे विशेष) मात्र आज शनिवारी वाशिम येथे पुन्हा एक रॅली निघाली असून या रॅलीतून नवाब मलिक मुर्दाबाद, समीर वानखेडे जिंदाबाद.. समीर वानखेडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. ही रॅली समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या नातेवाईक आणि भावकितील लोकांनी काढत पोलीस ठाण्यात जाऊन नवाब मलिक यांच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

एखाद्याच्या बाजूने उभे राहून त्याला सपोर्ट करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला आहे. मात्र जे प्रकरण सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे, त्याचे आज ना उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे त्या प्रकरणात रोज नवनवीन असे काही घडू लागल्याने हा दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवालही सर्वसामान्य लोकांना पडला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता या प्रकरणात पैशांची मागणी होणे, नंतर डील होणे, पैसे स्वीकारणे पुन्हा परत देणे असे प्रकार घडले आहेत त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचेच बनले आहे. या प्रकरणात नुसते आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत तर अनेक साक्षीदार आणि पुरावेही समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवून पुढे नेमके काय निष्पन्न होतेय यावर लक्ष केंद्रित करणे गरचेजे असल्याचे बोलले जात आहे.
आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जे आरोप लावले आहेत आणि जे काही समोर येत आहे त्यावर चौकशी होऊन त्यातील दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे असे सर्वचजण म्हणत आहेत. मग यात नेमकं राजकारण किंवा इतर अन्य गोष्टी येऊन हे प्रकरण इतर ठिकाणी भरकटण्याऐवजी जे सत्य आहे ते जगासमोर येणे ही काळाची गरज आहे त्यामुळे एकतर यात नवाब मलिक खोटे ठरतील किंवा समीर वानखेडे यांच्याबाबत काही महत्वाची माहिती समोर येईल..! त्यामुळे हा विषय दुसरीकडे न भरकटवता यातील संशयित किरण गोसावीसह अन्य सर्वांची चौकशी होणे गरजेचे बनले आहे. तर आणि तरच सत्य काय ते समोर येईल यात शंका नाही.