दौंड : मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारी आणि मूळच्या देलवडी (ता. दौंड जि.पुणे) येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली कदम हिने पोलीस दलात काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस कर्मचारी वाल्मीक अहिरे याच्या त्रासाला कंटाळून परवा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आज दि. 5 नोव्हेंबर रोजी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी देलवडी येथे पीडित कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिपाली कदम यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे कदम कुटुंबियांना आश्वासन दिले आहे.
दि.3 नोव्हेंबर रोजी दीपाली कदम हिने देलवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला केलेल्या मेसेजमध्ये तिचा वरिष्ठ पोलीस कर्मचारी वाल्मीक अहिरे हा तिला कशा प्रकारे मारहाण करत होता आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता याबाबत माहिती दिली होती.
पालघर येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारा वाल्मीक अहिरे याने दिपालीचे लग्न मोडून तिच्या कुटुंबियांची बदनामी केल्याने दीपाली हिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाउल उचलले होते. दिपलीच्या आत्महत्येनंतर वाल्मीक अहिरे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर तो पालघर पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. यवत पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.