बाबो… दौंडमधून 21 गाड्या लंपास करणारा महाठग निघाला.! खेड मधूनही 55 गाड्या केल्या लंपास, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

पुणे : वाहन मालकांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून दौंडमधून 21 चार चाकी वाहने लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. आता असाच प्रकार याच भामट्याने खेडमध्येही केल्याचे उघडकीस आले असून तेथील तब्बल 55 वाहन मालकांना त्याने गंडा घालून 55 वाहने गायब केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदविण्यात आला आहे.

सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी ता. खेड, जिल्हा पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महाठगाचे नाव असून त्याने दौंड तालुक्यातून सुमारे 21 वाहने फसवणूक करून पळवली होती. तर याच भामट्याने खेडमधूनही तब्बल 55 वाहने लंपास केल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारानंतर त्याने अजून कोठे-कोठे, काय-काय केले आहे याचा तपास सध्या खेड पोलीसांकडून केला जात आहे.
सागर साबळे या आरोपीविरुद्ध राजगुरूनगर येथील शुभम बाळू सांडभोर (रा.राजगुरूनगर, ता. खेड,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीमध्ये सागर मोहन साबळे याने त्यांच्याकडून नोटरी अॅग्रीमेंट करुन त्यांची वाहने भाडेतत्वावर घेवून सदर सर्व गाड्या आय.टी. कंपन्यांना भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवून जातो आणि त्याचा योग्य मोबादला देतो असे सांगितले होते.

या अॅग्रीमेंटमध्ये असणाऱ्या गाड्यांचे साबळे याने काही महीने पैसे पाठविले मात्र नंतर पैसे पाठविणे बंद केले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सागर साबळे यास संपर्क करुन विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला वाहन मालकांनी वारंवार संपर्क करुन ठरल्याप्रमाणे गाड्यांचे पैसे पाठव नाहीतर आम्हाला आमच्या गाड्या परत दे असे म्हणाले असता त्याने वाहन मालकांचे फोन उचलणे बंद केले. त्यामुळे यातील गाडी मालकांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली. आणि सागर साबळे याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्व 55 गाडी मालकांनी त्याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी सागर साबळे हा सध्या अश्याच प्रकारच्या गुन्ह्यात भोसरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खेड पोलीस ठाण्यात त्याच्यावर आत्तापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले असून गुन्ह्याचा तपास खेड चे पोसई भोसले हे करीत आहेत.