दौंड : (शहर प्रतिनिधी -अख्तर काझी)
पुणे -सोलापूर महामार्गावरील खडकी गावातील हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालीत जेरबंद केले आहे.
तीन आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आले असून इतर चार आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. गौरव भारत कुदळे (रा. भोईर नगर, आकुर्डी, पिंपरी चिंचवड), लहू उर्फ लाल्या अंकुश भिसे (रा. पिंपरी चिंचवड), महेश बाबुराव पाटील (रा. दत्तनगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड) असे अटक आरोपींची नावे आहेत.
घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे- सोलापूर महामार्गालगत खडकी गावातील हद्दीत शितोळे वस्ती (नंबर 1) ठिकाणी असलेल्या पुलाजवळ काही अज्ञात इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर खुद्द पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनाच मिळाल्याने पवार यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींवर झडप टाकीत तिघांना जेरबंद केले, त्यांच्यासोबत असलेले इतर चौघे अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले आहेत. आरोपींकडून तीन दुचाक्या, तीन सत्तुर, एक गुप्ती, एक मिरची पुड पाकीट, ग्रिफ वायर, पक्कड असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक फौजदार भगत, पो. हवालदार पांडुरंग थोरात, मलगुंडे, भोसले, पो. नाईक गवळी, पो. कॉ. हिरवे,हंडाळ, देवकाते तसेच स्थानिक पोलीस मित्र ज्ञानेश्वर शितोळे, जहांगीर शेख, गोरख शितोळे या पथकाने सदरची कारवाई बजावली.
पुढील तपास पो. उपनिरीक्षक खरात, मदतनीस पो. कॉ. भोंगळे, गोलांडे करीत आहेत.