दौंड : शासनाकडून हागणदारीमुक्त हि संकल्पना राबवली जात असताना प्रत्येकाला हक्काचे संडास बांधून देण्यासाठी शासनाने मोठी आर्थिक मदत केली आहे. मात्र तरीही काहीजण जुनी पद्धत वापरून मोकळ्यातच मोकळे होण्यात धन्यता मानत असतात आणि यातूनच मग त्यांना कधी कधी मोठा आर्थिक फटकाही बसतो. असाच एक प्रकार दौंडजवळ असणाऱ्या वायरलेस फाट्याजवळ (गिरीम) राहणाऱ्या इसमा सोबत घडला असून त्याच्या एका चुकीमुळे त्याला सुमारे 50 हजारांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
तर झाले असे की अमोल ठाकरे (व्यवसाय आचारी, रा.पांढरेमळा, वायरलेसफाटा गिरीम.ता.दौंड) हा इसम सोनवडी फाट्याच्या पुढे नवीन झालेल्या नदी ब्रिजच्या अलीकडे असणाऱ्या एका झुडुपामध्ये नित्यनियमाप्रमाणे सौचास (संडासला) जाऊन बसला. त्यावेळी तेथे तीनजण एका मोटारसायकलवर आले आणि त्यांनी त्याच्या देखत त्याने सोबत आणलेली मोटार सायकल हि चोरी करून घेऊन गेले. त्याच्या डोळ्यासमोर हे घडत असताना तो त्या अवस्थेत उठून पाठलाग करेपर्यंत चोरटे त्याची 50 हजारांची मोटार सायकल घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी अमोल ठाकरे याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.