पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे भरदिवसा गोळ्या घालून वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा गेम करण्यात आला. हा गेम पूर्वनियोजित असून याची पूर्वकल्पना संतोषला ही होती असा कयास पोलिसांकडून लावण्यात येत असून आता या खून प्रकरणी पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याने अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. याबाबत लोणीकाळभोर चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपी पवन गोरख मिसाळ (वय 29 रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय – 26, तांबेवस्ती, दत्तवाडी, उरुळी कांचन) या दोन आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याचे सांगितले आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने 30 तासांच्या आत या दोन आरोपींना जेरबंद केले होते. संतोष जगताप याचा खून करताना नेमके कितीजण होते ही माहिती अजून समोर आली नसली तरी 6 ते 7 आरोपींनी मिळून संतोषवर गोळीबार करत हल्ला चढवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. यातील तीनजण हे अगोदरच दबा धरून बसले होते तर मागून आलेल्या कार मधून चाइ ते पाचजण उतरून या हल्ल्यात सामील झाल्याचे बोलले जात आहे. संतोष जगताप खून प्रकरणात वाळू व्यावसायिक, गॅंगस्टर, जुने खून खटल्यातील संशयित आणि त्याची ज्यांच्याशी काही दिवसांत वाद झाले होते असे सर्वबाजूने पोलीस तपास करत असल्याने यातील सुत्रधारांचे धाबे दणाणले असतील यात शंका नाही. 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती येणार असून यानंतर मात्र खरे सूत्रधार समोर येतील असे बोलले जात आहे.