कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची तक्रार आम्ही दिली आणि आम्हीच आरोपी कसे..! शेतकऱ्यांचा फायदा करून देणे गुन्हा आहे का.., केवळ राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झाल्याचा खरेदी विक्री संघाचा आरोप

दौंड : दौंड तालुका खरेदी विक्री संघात 40 लाख 86 हजार रुपयांचा अपहार झाल्याबाबत लेखापरीक्षक भुजबळ यांच्या फिर्यादीनुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड तालुका खरेदी विक्री संघाकडून तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप त्यांनी खोडून काढत या प्रकरणातील सत्यता समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विद्यमान संचालक मंडळातील माजी चेअरमन लक्ष्मण दिवेकर आणि भानुदास नेवसे यांनी लेखा परीक्षक भुजबळ यांनी चुकीच्या पद्धतीने फिर्याद दिल्याचे सांगत आम्ही दि.5/08/2020 रोजी यवत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती असे सांगितले. तसेच यातील तीन कर्मचारी शितोळे, मेंगावडे आणि आबा कुल यांची संघाने खाते निहाय चौकशी लावली आहे. मात्र या तीन कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठीच आम्हा नऊ जणांना गुंतविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून रीऑडिट मधून सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास उपस्थितांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
बांधकामासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्या खासदार फंडातून इस्टीमेटमध्ये 1750 स्क्वेअर फूट बांधकाम होणे अपेक्षित असताना ते बांधकाम मा.चेअरमन व संचालक मंडळाने वाढवून ते 2600 स्क्वेअर फुट इतके बांधकाम केलेले आहे. त्याचबरोबर जुने गोडाऊनची दुरूस्ती, नवीन इमारतीची साईडची पी.सी .सी, जीना ग्रील वाढीव गॅलरी व जीना इ. कामे त्यामध्ये जादा केलेली आहेत त्यामुळे यात भ्रष्टाचार किंवा अपहार झाला हे म्हणणे चुकीचे असल्याचे लक्ष्मण दिवेकर यांनी स्पष्ट करत आम्ही खा.सुप्रिया सुळे यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही असे सांगितले.
औषध खरेदीबाबत माहिती देताना भानुदास नेवसे यांनी आम्ही एमबीएफ कंपनीची 34 लाखाची औषधे खरेदी केलेली आहेत हे म्हणणे चुकीचे असुन माझ्या कार्यकाळात 30 लाखाची खरेदी असुन 3 लाख 50 हजारांचा न विकलेला परत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा माल थेट कंपनीकडून खरेदी केल्याने त्यात संघाला 13 लाखांचा फायदा झाला आणि डीलरकडून 370 रूपयांना मिळणारा माल थेट खरेदी केल्याने अवघ्या 259 रुपायांना मिळाला आणि शेतकऱ्यांना 580 रुपयांना देण्यात येणारा माल आम्ही अवघ्या 350 रुपयांना शेतकऱ्यांना विकला त्यामुळे यात शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आणि डीलर लोकांची चैन यामुळे तुटली. यात अफरातफर किंवा भ्रष्टाचार कुठे आहे असा सवाल भानुदास नेवसे यांनी उपस्थित केला. तसेच चेअरमन जगताप यांच्या कार्यकाळात राहिलेला माल परत केला त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 5 लाखाचा माल खरेदी केला. त्यामुळे नेवसे यांचेवरील 34 लाख रुपयांचा माल खरेदी हा आरोप चुकीचा असून खरेदी केलेला सदर माल कंपनीच्या एम.आर.पी पेक्षा सरासरी 15 ते 20% कमी दराने शेतकऱ्यांना विक्री केलेला आहे त्यामुळे संस्थेचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माल औषध कंपनीकडुन थेट खरेदी करण्याच्या निर्णयामुळे संस्थेला अवघ्या 34 लाखाच्या खरेदीमध्ये 13 लाखांचा नफा झालेला आहे.
डेपोपमुस्खांनी कमी जादा दराने खते व औषधे विक्री केलेली नसुन संस्थेने ठरवुन दिलेल्या दरानुसारच ती विकलेली आहे आणि कोणत्याही डेपो प्रमुखाने एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री केलेली नाही त्यामुळे डेपोप्रमुखांवर केलेले आरोप हे चुकीचे असल्याचे मा.चेअरमन आणि संचालक मंडळाकडून या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन अशोकराव गव्हाणे, संचालक उद्धव फुले, लक्ष्मण दिवेकर, श्रीरंग म्हस्के, अशोक नरुटे, भानुदास नेवसे, व्यवस्थापक सुहास रुपणवर हे उपस्थित होते.