Crime News
पुणे : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात आपले बस्तान बसवलेल्या अप्पा लोंढे याच्या टोळीला दौंड तालुक्यात जरब बसवून अप्पा लोंढेला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करत त्या टोळीचा बंदोबस्त करणाऱ्या त्यावेळच्या पोलीस अधिकारी राजेंद्र मोकाशी यांच्यावर आता अप्पा लोंढे च्या विरोधी टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान समोर येऊन ठाकले आहे.
अप्पा लोंढे याच्या टोळीचा बिमोड करून लोकांच्या मनातील धास्ती कमी करण्यात यश मिळवलेल्या राजेंद्र मोकाशी हे आता लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत आणि कालच्या टोळी युद्धातून झालेल्या हत्याकांडाचा तपास हा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे त्यामुळे आता ते गुन्हेगारीचे उच्चाटन या परिसरातून कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काल दि.22 ऑक्टोबर रोजी भर दुपारी उरुळी कांचन येथील चौकाजवळ वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा खून करण्यात आला. हा खून टोळी युद्धातून झाला असावा असा कयास लावला जात आहे. हा खून करणारे तरुण हे 20 ते 30 वयाच्या आतील असल्याचे बोलले जात असून संतोष जगताप याचा खून करण्यासाठी आलेले हल्लेखोर हे या अगोदर एका हत्या प्रकरणाती आरोपी असल्याचे समोर येत आहे. कारण एका हत्येत सहभाग असणाऱ्या खैरे याचाही काल या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे एका गटातील टोळी चे मुख्य मोहरे टिपले गेले असले तरी प्रतिस्पर्धी टोळी मात्र आता एक तऱ्हेने मजबूत झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता या टोळीचा बिमोड लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी कश्या पद्धतीने आणि कोणती व्यूहरचना आखून करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. समोरील टोळीतील मुख्य टार्गेट मारले गेल्यानंतर जी टोळी उदयास येणार आहे त्याची दहशत आजच लोकांच्या मनामध्ये पाहिली जाऊ शकते त्यामुळे हवेली, दौंड परिसरात गुन्हेगारी टोळ्यांना डोके वर काढू द्यायचे नसेल तर पोलीस प्रशासनाला आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा अजून कोणीतरी नवीन भाई उदयाला येऊन सर्वसामान्य जनतेचे जीने मुश्किल करेल यात शंका नाही.