Crime News
पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या उरुळी कांचनमध्ये पुन्हा एकदा मोठे हत्याकांड घडले आहे. तशी हत्या होण्याची ही घटना उरुळीकरांना नवीन नाही. या अगोदरही उरुळीकांचन ने टोळी युद्धातून अनेक हत्या पाहिलेल्या आहेत. जशी साधारण 18-19 वर्षांपूर्वी भर बाजारपेठेत सभापती भाऊ लोंढे यांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून झालेली हत्या, त्यानंतर त्यांचा लहान भाऊ अप्पा लोंढे याची काही वर्षांपूर्वी त्यांच्या निवासस्थानाजवळ तीक्ष्ण हत्यार आणि नंतर गोळी मारून झालेली हत्या, किंवा मागील 2 महिन्यापूर्वी हॉटेल गारवा समोर झालेली रामदास आखाडे यांची कोयत्याने वार करून झालेली हत्या. हे उरुळीकरांनी जवळून अनुभवल्यामुळे त्यांना हि हत्याकांडे नवीन नाहीत. मात्र, आज दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी संतोष जगताप याची जी हत्या झाली ती येथील नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारी हत्या नक्कीच म्हणता येईल. कारण या हत्येमध्ये कोयता, चाकू, गुप्ती या हत्यारांचा जास्त वापर न होता थेट पिस्तुल आणि गोळ्यांचा वापर झाला आहे. हि बाब निश्चितच चिंताजनक आहे. आणि काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर येथील आपला अनुभव सांगितला आहे तो मात्र भयानक आहे. कारण संतोष जगतापला मारण्यासाठी जे प्लॅनिंग करण्यात आले त्यामध्ये तो एका हॉटेलच्या बाहेर पडत असताना त्यावर दबा धरून बसलेले हल्लेखोर तिन्ही बाजूंनी म्हणजेच रस्त्याच्या पलीकडून, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने असे पिस्तूलांतून गोळ्या झाडत समोर आले आणि काही समजायच्या आतच दोन्ही बाजूंनी गोळीबाराला सुरुवात झाली. हा गोळीबार होत असताना नागरिक मात्र भयभीत होऊन जिवाच्या भीतीने सैरा-वैरा पळत सुटले. संतोष जगताप हा हॉटेल मधून बाहेर पडताच त्याच्यावर अचानक तिन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्याने संतोष जगताप यानेही आपले पिस्तुल बाहेर काढत गोळ्या झाडण्यास सुरुवात केली आणि त्याच्या गाडीजवळ जाण्याचा तो प्रयत्न करू लागला. यावेळी हल्लेखोर हे त्याच्या दिशेने येत असताना तेथे त्यांचे एक चारचाकी वाहनही आले. आणि त्यांनीही संतोष जगतापला लक्ष केले. हे होत असताना जगतापच्या अंगरक्षकांनीही समोरील गुंडांवर गोळीबार सुरू केला. ज्या ठिकाणी हा गोळीबार होत होता ते ठिकाण होते पुणे-सोलापूर हायवे आणि हॉटेलच्या मध्ये होते. थेट उरुळी कांचन चौकाच्या अलीकडे एका प्रसिद्ध हॉटेलसमोर हे सर्व घडत होते. त्यामुळे या गोळीबारात किती हानी झाली असती याचा विचार न केलेलाच बरा. हे हॉटेल आणि पुणे सोलापूर हायवे हा रहदारीने कायमच गजबजलेला असतो आणि गजबजलेल्या रस्त्यावर एखाद्या चित्रपटात शोभेल असा येथे गोळीबार सुरू होता. या गोळीबारात संतोष जगताप याच्या दंडावर, ब्रेसलेटवर आणि छातीत गोळी लागल्याने तो ठार झाला मात्र तो हल्लेखोरांचा प्रतिकार करत असताना यात एक हल्लेखोरही मारला गेला. जगताप याच्या अंगरक्षकाने हल्लेखोर त्यांच्या एका जखमीला गाडीत टाकून पळून जात असताना त्या गाडीच्या टायरवर फायरिंग करून गाडी पंक्चर केली मात्र तरीही हल्लेखोरांनी ती गाडी तशीच दामटत नेत तेथून फरार झाले.
cctv footage -संतोष जगतापवर गोळ्या झाडून वाहनातून फरार झालेले आरोपी स्वतःच्या जखमी साथीदाराला हॉस्पिटमध्ये टाकून पळ काढताना
या हल्ल्यात संतोष जगतापचा अंगरक्षकही गंभीर जखमी झाला असून त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीसांनी अजूनतरी तशी अधिकृत घोषणा न केल्यामुळे आत्तापर्यंत संतोष जगताप आणि समोरील हल्लेखोरांच्या टोळीतील एकजण असे दोन जण ठार झाल्याची अधिकृतरीत्या माहिती दिली जात आहे. भर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्राणावर हल्ला होणे आणि त्यात पिस्तूलाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार होणे ही बाब निश्चितच चिंताजनक मानली जात आहे. पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली असून लवकरच आरोपी पकडले जातील असा विश्वास लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी व्यक्त केला आहे. (सध्या पोलीसांनी जवळपासच्या काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज आणि डिव्हीआर ताब्यात घेतले असून त्यावरून आरोपींचा छडा लावणे सोपे जाणार आहे आणि घडलेल्या हत्याकांडाचे चित्रीकरणही त्यात असल्याने घटनेची दाहकातही समोर येणार आहे)