Daund Nagar Palika – दौंड नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात नगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन, नगराध्यक्षांच्या आडमुठे धोरणामुळे कोट्यवधींचा विकास निधी पडून असल्याचा पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवकांचा आरोप



|सहकारनामा|

दौंड : दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे रखडली आहेत, सभा घेण्याबाबत नगराध्यक्षांना वारंवार विनंती करूनही त्यांचा हेकेखोर पणा सुरूच असल्याने त्यांच्या या आडमुठे धोरणा विरोधात दिनांक 6 ऑगस्ट पासून नगरपालिकेला टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख व सत्ताधारी पक्षाचे गटनेते राजेश गायकवाड यांनी  जाहीर केले आहे.  दोन्ही गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आंदोलना बाबतची भूमिका मांडली. उपनगराध्यक्ष विलास शितोळे, ज्येष्ठ नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, जीवराज पवार, वसीम शेख, संजय चितारे,गौतम साळवे यांनीही यावेळी आपल्या व्यथा मांडल्या.

गटनेते बादशहा शेख म्हणाले की, शासनाच्या परिपत्रका नुसार दर महिन्याला सभा घेणे बंधनकारक असताना नगराध्यक्ष शितल कटारिया मागील 5 ते 6 महिन्यांपासून राजकीय सूडबुद्धीने सभा घेत नाहीत, त्यांना विकृती झाली आहे की मी काम करणार नाही आणि कोणाला करूनही देणार नाही. निविदा मंजुरी करिता स्थायी समिती व विविध विषया करिता सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक असून मागील 5 महिन्यांपासून नगराध्यक्षांनी मीटिंग न घेतल्याने शहरातील विकास कामांना मंजुरी देऊन ती कामे सुरू होऊ शकलेली नाहीत, त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक विकासा पासून वंचित राहिला आहे. शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे बील थकलेले आहे, ज्यामुळे त्याने शहरातील कचरा उचलणे बंद केले आहे त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सुरक्षा रक्षकांचे पगार थकलेले आहेत, वार्षिक ठेकेदारांची बिले काढता आलेली नाहीत हे सर्व प्रकार नगराध्यक्ष यांनी सभा न घेतल्यामुळे होत आहेत. म्हणून नगराध्यक्षांच्या कारभाराविरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत.

            नगरपालिकेतील दुसरे गटनेते राजेश गायकवाड यांनी नगराध्यक्ष सहित त्यांच्या पति वरच गंभीर आरोप केले. त्यांना दोन नंबरचे पैसे चालतात, नगरपालिकेतील टक्केवारी चालते. आम्ही तर फक्त जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करतोय तरी आमच्या कामांना सभा न घेऊन अडविले जात आहे.40 वर्ष झाले म्हणता तुम्ही नगरपालिकेच्या राजकारणात आहात मग इतक्या दिवसात काय दिवे लावले त्यांनी सांगावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इंद्रजीत जगदाळे यांनीही नगराध्यक्षांच्या कारभारावर ताशेरे ओढत म्हणाले, 6-7 महिने झाली स्थायी सभा, सर्वसाधारण सभा घेतली जात नाही. त्यामुळे शहरातील सर्व विकास कामे ठप्प पडली आहेत. सभा नसल्याने सर्वांचीच देणी बाकी आहेत त्यामुळे त्यांनी कामे बंद ठेवली आहेत. सभा घ्या हे सांगायला जिल्हाधिकारी यांच्याकडे जावे लागते हे सर्व नगरसेवकांचे दुर्दैव आहे असेही जगदाळे म्हणाले.

नगरसेवक जीवराज पवार तर आपली व्यथा मांडताना रडलेच, नागरिकांना  सोयी, सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु एखाद्या विकास कामा विरोधात कोणाची तक्रार आली की काम बंद केले जाते असा अजब कारभार सध्या नगर पालिकेत सुरू आहे. माझ्या प्रभागातील स्मशान भूमी कामाला केवळ गलिच्छ राजकारणामुळे विरोध केला जात आहे. कोणाला जर वाटत असेल की माझ्या प्रभागात कामे झाली तर त्याचा मला पुढील निवडणुकीमध्ये फायदा होईल तर मी जाहीर करतो की मी आगामी निवडणूक लढविणार नाही परंतु लोकां साठीची प्रलंबित कामे पूर्ण करा असेही पवार यांनी जाहीर केले.

नगरसेवक वसीम शेख व गौतम साळवे म्हणाले की 7 व 8 नंबर प्रभागांमध्ये दलित वस्ती निधीतून चार कोटी 63 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत, परंतु फक्त स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मंजुरी आवश्यक आहे तीच होत नसल्याने ही कामे प्रलंबित राहिली आहेत.