|सहकारनामा|
पुणे/दौंड : (अब्बास शेख)
एसटी बस लुटली, मोठ्याप्रमाणावर पैसे आले मात्र आता ते ठेवायचे कुठे आणि कोणी आपल्या मागावर तर नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न आरोपींच्या डोक्यात येत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला आणि त्याच वेळी नेमकी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाची तेथे एन्ट्री झाली. आरोपींना काही कळण्याच्या आतच ते जेरबंद झाले होते. हा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असा आहे परंतु हे प्रत्यक्षात घडले आहे आणि तेही पुण्याच्या जवळ…
दि.३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजता यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पाटस जवळ ४ प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून १ कोटी १२ लाख ३६ हजारांना लुटल्याची घटना घडली होती. याबाबत हितेंद्र बाळासाो जाधव, (रा. वाघोशी, ता. फलटण, जि. सातारा)
यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
फिर्यादी हे दि. ०२/०८/२०२१ रोजी
लातूर ते मुंबई या एस.टी.बसमधून सोलापूर ते पुणे हायवे रोडने प्रवास करीत असताना चार अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून एस.टी.बसला गाडी आडवी मारत पास असणारे फिर्यादी
व इतर साक्षिदार यांना खाली उतरवले होते. यानंतर आरोपींनी फिर्यादी व इतरांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे ताब्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण रू. १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ.श्री. अभिनव देशमुख साो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलिंद मोहीते साो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस
यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोलीस उप निरीक्षक श्री. शिवाजी ननवरे, सहा.फौज.पंधारे, शब्बीर पठाण, पो.हवा.राजू मोमीन, जनार्दन शेळके, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना. अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, पो.कॉ.धिरज जाधव, बाळासाहेब खडके, चा.पो.कॉ.दगडू विरकर, काशीनाथ राजापूरे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केलेले होते.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास तांत्रिक
विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा वरूडे येथील गणेश भोसले व त्याचा भाऊ रामदास भोसले यांनी त्याचे इतर साथिदारांसह केला आहे व रामदास भोसले हा त्याच्या साथिदारांसह आता पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ खराडी बायपास येथे जावून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या १) रामदास भाऊसाहेब भोसले, (वय ३० वर्षे, रा. वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे) २)
तुषार बबन तांबे, (वय २२ वर्षे, रा. वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे) ३) भरत शहाजी बांगर, (वय ३६ वर्षे, रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे) यांना पकडले.
यावेळी आरोपींनी गुन्ह्यात चोरलेल्या मालापैकी तुषार बबन तांबे याचेकडून रू. १,५०,०००/- तसेच इसम नामे भरत शहाजी बांगर याचेकडून रू. ३०,०००/- जप्त केले. तर रामदास भाऊसाहेब भोसले याने त्याचे शेतातील ऊसाचे शेतात लपवून ठेवलेले रू. ९१ लाख ०३ हजार ०४०/- किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. LCB पथकाने आरोपींकडून एकुण ९२ लाख ८४ हजार ५४० रुपये जप्त करण्यात यश मिळवले आहे.
तर आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपीटर मोटार सायकल जप्त केलेली असून आत्तापर्यंत १ कोटी ५४ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी रामदास भाऊसाहेब भोसले याचा भरत शहाजी बांगर हा बहीणीचा पती आहे इतर आरोपी हे त्यांचे मित्र आहेत, सदर गुन्हयात आणखी आरोपीचा सहभाग आहे काय बाबत तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.श्री. भाऊसाहेब पाटील, यवत पोलीस स्टेशन करीत आहेत.