|सहकारनामा|
दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)
दौंडच्या नगराध्यक्षा शितल कटारिया या मनमानी पद्धतीने व आडमुठेपणाच्या धोरणाने कामकाज करीत आहेत, नगरसेवकांनी वारंवार विनंती करूनही नगराध्यक्ष स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्यास तयार नाही त्यामुळे शहरातील कोट्यवधींची विकास कामे रखडवली आहेत असा आरोप विरोधकांनी करून नगराध्यक्ष यांच्या या आडमुठे धोरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख व सत्ताधारी गटाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी पासून नगरपालिकेला टाळेठोक आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सदरचे आंदोलन जोपर्यंत नगराध्यक्ष सभा बोलवीत नाहीत तोपर्यंत बेमुदत करणार असल्याचे बादशहा शेख यांनी या वेळी सांगितले. नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.
आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11वा. च्या सुमारास आंदोलनकर्ते नगरसेवकांनी नगरपालिकेचा ताबा घेत मुख्य प्रवेश द्वारा समोरच नगरपालिकेचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी, सभा न घेता दौंड शहराचा विकास वेठीस धरणाऱ्या नगराध्यक्षांचा निषेध असो, नगराध्यक्ष हाय -हाय अशा घोषणा देण्यात आल्या. मागास वर्गीय समाज वेठीस रहावा या दृष्ट हेतूने नगराध्यक्ष कामकाज करीत असल्याचा आरोप उपस्थित नगरसेवकांनी केला.
नगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोरच आंदोलन सुरू असल्याने नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी नगरपालिकेच्या खाली हतबल होऊन थांबले होते व जे नागरिक कामानिमित्त नगरपालिकेत आले होते त्यांना नाईलाजास्तव कामा विनाच घरी परतावे लागले.
मागील चार साडेचार वर्ष दोन्ही गटाचे कामकाज( आता ते कोणते हे विचारू नका) गुण्या गोविंदाने चालत आले होते. परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यात नेमकी माशी कोठे शिंकली कोणास ठाऊक, दोन्ही गटाचे संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसते आहे. यात कोण चूक कोण बरोबर हे देवच( जिल्हाधिकारी) जाणे मात्र याचा फटका दौंडकर नागरिकांनाच सहन करावा लागत आहे हे नक्की.
विरोधकांच्या या आंदोलनाला आता कटारिया गट काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना काळात मनोरंजनास मुकलेल्या दौंडकर नागरिकांना पुढील सहा महिने नगर पालिकेच्या माध्यमातून भरपूर मनोरंजनाच्या परवणीचा लाभ मिळत राहणार यात शंका नाही.