दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)
दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख व सत्ताधारी गटाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात दि.9 ऑगस्ट पासून नगरपालिकेला टाळे ठोक( कामकाज बंद) आंदोलन सुरू केले आहे. आणि जोपर्यंत नगराध्यक्ष सभा बोलवीत नाहीत तोपर्यंत आंदोलन बेमुदत सुरू ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला ही नौटंकी असल्याचे जाहीर करीत ऑल इंडिया पँथर सेना टाळे खोलो आंदोलन करणार आहे. आणि या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार करणार आहेत. या आंदोलनाबाबत संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष सागर उबाळे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यामुळे सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी आंदोलन स्थळी (नगरपालिका कार्यालय) राष्ट्रवादी व पँथर हे दोन्ही आमने सामने भिडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पँथर सेनेने निवेदनात असे नमूद केले आहे की, राष्ट्रवादीचे आंदोलन ही सर्व नौटंकी आहे, नगराध्यक्ष महिला असल्याने त्यांच्यावर दबावगट तयार करण्याचे हे षड्यंत्र आहे ते कदापि खपवून घेतले जाणार नाही त्यामुळे राष्ट्रवादी ची नौटंकी थांबविण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटाचे नगरसेवक तसेच स्वयंघोषित विरोधात जाणारे सत्ताधारी गटाचे नगरसेवक राजकीय सत्तेच्या हव्यासापोटी नगराध्यक्ष शितल कटारिया यांच्यावर मनमानी कारभार, तसेच सर्वसाधारण सभा घेत नाही त्यामुळे शहरातील 20 कोटी रुपयांची विकास कामे रखडली आहेत, कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे दिल थकित आहे, नागरिकांच्या पाण्या बाबतचे प्रश्न रखडले आहेत असे बिनबुडाचे आरोप विरोधकांकडून होताना दिसत आहे. नगराध्यक्ष यांच्यावर होणारे आरोप अत्यंत निराधार व चुकीचे असून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष यांना जनतेसमोर बदनाम केले जात आहे. मागासवर्गीय समाजाबद्दल खूप आस्था व तळमळ असल्या सारखे दाखविणारे विरोधी गटाचे नगरसेवक इतर वेळी मागास वर्गीय प्रभागांमध्ये कामे करताना दिसत नाही. मागास वर्गीय समाजाबद्दल यांची तळमळ खोटी असून विकास कामे मंजूर झाल्या नंतर ठेकेदारांकडून मिळणाऱ्या पाकिटांसाठीचा चाललेला हा सर्व खटाटोप सुरू आहे. मागास वर्गीय समाजाच्या नावाखाली स्वतःची घरे भरण्याचा हा डाव तात्काळ थांबवावा व दौंड नगरपालिकेला टाळे ठोकल्याने नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना जनतेची एवढीच काळजी असेल तर त्यांनी आपले राजीनामे तात्काळ द्यावेत, नगर पालिकेसमोर रडत बसू नये. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येणाऱ्या दोन दिवसात प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.