|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
दौंड शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे चित्र दिसू लागले आहे, याला निमित्त ठरत आहे, राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष यांच्या विरोधात नगरपालिकेत सुरू असलेले आंदोलन आणि या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेने दिलेले आव्हान. नगराध्यक्ष यांच्या मनमानी कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी नगरपालिकेतील कामकाज बंद आंदोलन छेडले आहे. आणि हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पँथर सेना पुढे सरसावली असल्याने या दोन्ही आंदोलनाला जातीय रंग लागण्याचे संकेत मिळत आहेत. नगरपालिकेत दि. 9 ऑगस्ट रोजी आंदोलनकर्ते समोरा समोर भिडणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन येथील पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचा अंदाज येतो आहे.
राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष यांच्या विरोधातील नगरपालिकेला टाळे ठोक आंदोलन हे नौटंकी असून या नगरसेवकांना मागास वर्गीय समाजाबद्दल आस्था नसून विकास कामे मंजूर झाल्या नंतर ठेकेदारांकडून मिळणाऱ्या पाकिटांसाठीचा सारा खटाटोप आहे, नगर पालिकेतील कामकाज बंद पाडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पँथर सेना राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला विरोध करणार असून दि. 9 ऑगस्ट रोजी नगरपालिकेतील कामकाज सुरू करण्यासाठी आंदोलन करणार आहे.पँथर सेनेने या आंदोलना बाबतचे निवेदन तहसीलदारांना दिल्यानंतर, राष्ट्रवादीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गटनेते बादशहा शेख व राजेश गायकवाड यांनी सुद्धा तहसीलदारांकडे एक निवेदन दिले आहे, आणि पँथर सेनेचे आव्हान स्वीकारत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शांततामय पद्धतीने सुरू असलेल्या दौंड नगरपालिकेतील कामकाज बंद आंदोलनास कटारिया हे हिंसक वळण देऊन जातीय दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कायद्याने दिलेल्या अधिकाराने आम्ही आंदोलन करीत असून सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी पासून पुन्हा, आमच्या मागण्या मान्य होई पर्यंत तसेच बेमुदत सुरू राहणार आहे. कटारिया हे कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असतील तर जशास तसे उत्तर देण्यात येईल. आंदोलन कोण दडपणार असेल व नगरपालिकेतील कामकाज चालू करणार असेल तर राष्ट्रवादी, शिवसेना व नागरीकहित संरक्षण मंडळाचे दोन नगरसेवक त्यांच्या स्टाईलने स्वागत करण्यासाठी तयार आहोत असे आव्हान ही निवेदनातून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी, मित्र पक्ष व ऑल इंडिया पँथर सेना यांनी परस्परांना आव्हान देणारी निवेदने दिल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आणि सोमवारी नेमका कोणता राडा पहायला मिळणार याकडे दौंडकर व पोलीस प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.