दौंड : दौंड- गोपाळवाडी रोड परिसरातील शिवराज नगर, भवानीनगर व गजानन सोसायटी येथील चार घरांमध्ये घुसून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवीत, मारहाण करीत 2 लाख 86 हजार 500 रु. चा ऐवज चोरून नेल्याने शहरात खळबळ उडाली. भवानी नगर येथील एका CCTV फुटेज मध्ये शस्त्रधारी चोरटे कैद झाले आहेत. या फुटेज मधील चित्रण व्हाट्सअप ग्रुप वरून सर्वत्र वायरल झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
दौंड दरोडा cctv फुटेज, Daund Robbery cctv footage
भवानीनगर येथे राहणारे दौंड पोलीस स्टेशनचे पो. कर्मचारी अण्णासो. देशमुख यांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली व शास्त्राचा धाक दाखवीत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 1 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. तसेच याच 5 दरोडेखोरांनी शिवराज नगर येथे राहणाऱ्या सुनील बाराते यांच्या घरातील कपाटातून 150 डॉलर तसेच इतर ऐवज असा 14 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. गजानन सोसायटीत राहणाऱ्या वनिता तुपेकर यांच्या घरात घुसून चोरट्यांनी 6 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा 62 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सरपंच वस्ती येथील किशोर ढमे यांच्याही घरातून 77 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरी चोरी करून चोरट्यांनी चोरून नेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दौंड पोलिसांनी 5 अज्ञात चोरट्या विरोधात दरोडा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दौंड-गोपाळवाडी रोड परिसरात एकाच रात्रीत चार घरांमध्ये घुसून दरोडेखोरांनी चोरी केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याच परिसरात या आधी सुद्धा दरोडा, जबरी चोरी च्या अनेक घटना घडलेल्या आहेत. दौंड पोलिसात या घटनांची नोंद आहे. याच परिसरातील घरांना, बंगल्यांना चोरटे नेहमीच आपले लक्ष करीत आलेले आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये पोलीस चौकी अत्यंत गरजेची आहे अशी मागणी अनेकदा झालेली आहे. या चार गंभीर घटनांमुळे दौंड पोलिसांनी या परिसरात आतातरी पोलीस चौकी द्यावी या मागणीने जोर धरला आहे.
बारामती विभागाचे अप्पर पो. अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पो. अधिकारी राहुल धस, पो. निरीक्षक विनोद घुगे यांनी घटना स्थळांना भेट दिली व घटनेची माहिती घेऊन जलद तपासाच्या सूचना केल्या आहेत.