|सहकारनामा|
दौंड : दौंड शहर व तालुक्यातील वाळू माफिया व त्यांचा भीमा नदी पात्रातील हैदोस हा विषय येथील पोलीस प्रशासन व महसूल विभागाला नेहमीच त्रासदायक ठरत आलेला आहे.
याच वाळू माफियांचा बिमोड करण्यासाठी, भीमा नदी पात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी तसेच पूर परिस्थितीमधील आपत्ती व्यवस्थापनासाठी दौंड पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक स्पीड बोट दाखल झाली आहे. सर्वात जास्त नदी किनारा असणाऱ्या व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दौंड पोलिसांना स्पीड बोट उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पो. निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. स्पीड बोट सहित 12 लाईफ जॅकेट दौंड पोलिसांकडे उपलब्ध झाले असून पो. निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थित भीमा नदी पात्रात प्रात्यक्षिक करण्यात आले.
दौंड शहर व तालुक्यातील भीमा नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून वाळू माफिया वाळूची तस्करी करतात, नदीपात्रामध्ये या वाळू माफियांवर कारवाई करताना पोलिसांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. नदीपात्रातील वाळू माफियांच्या वेगवेगळ्या ठिय्या चा शोध घेऊन वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तसेच पूर परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचण्यासाठी या स्पीड बोटीचा वापर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.