दौंड :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेश शामराव जाधव यांच्या विरोधात 13 ऑक्टोबर रोजी विनयभंग व खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने शहरातील राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती. दौंड पोलिसांनी याप्रकरणी राजेश जाधव यांस अटक केली होती. एक दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयाने जाधव यांची जामिनावर सुटका केली आहे.
सुटका झाल्यानंतर जाधव यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडताना आपण पूर्णपणे निर्दोष असून फक्त आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीमध्ये मला पराभुत करता येणार नाही या उद्देशाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले.
राजेश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना मी कायदेशीर सावकारीचा व्यवसाय करीत असून माझ्याकडे त्याचा परवाना आहे. मी सदर फिर्यादी व्यक्तीला अडीच लाख रुपये दिलेले होते, ती रक्कम परत करण्यासाठी मला तितक्याच रकमेचा धनादेश दिला गेला. परंतु तो धनादेश बँकेत वटलाच नाही. म्हणून मी या बाबत तक्रारही दिली आहे. मी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांविरोधात दौंड पोलिसांकडे दोन महिन्या अगोदर लेखी तक्रारी दिलेल्या होत्या.
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्या वकिलांनी हे सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले आणि या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या असून मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, जनतेने मला निवडून दिले आहे, मी जनसेवक आहे, त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल झाल्या नंतर मी फरार होऊन इतर कायद्याचा मार्ग अवलंबिला नाही. मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा न केल्यामुळेच स्वतःहून पोलिसात हजर झालो. राजकीय वैमनस्यातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात येऊन मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा राजकीय डाव असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.