daund nagarpalika issues – नगराध्यक्षांच्या विरोधातील दौंड नगरपालीकेमधील राष्ट्रवादीचे आंदोलन आणखीनच चीघळण्याच्या मार्गावर? नगरपालिकेचे कामकाज सुरू झाल्याने पॅंथर सेना खुश!



|सहकारनामा|

दौंड : नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात दौंड राष्ट्रवादी काँग्रेस – मित्र पक्षा च्या गटनेते व नगरसेवकांनी दिनांक 6 ऑगस्ट पासून नगरपालिकेतील कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे नौटंकी असून कामकाज बंद आंदोलनामुळे सामान्य नागरिक वेठीस धरला जात आहे म्हणून येथील ऑल इंडिया पँथर सेनेने दि. 9 ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे कामकाज सुरू करण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली. 

परस्परांना आव्हान देणाऱ्या या दोन आंदोलनामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व आंदोलनाला गंभीर वळण लागेल या शक्यतेने पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून दोन्ही गटामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला व नगराध्यक्ष, नगरपालिकेतील दोन्ही गटनेते व नगरसेवकांची बैठक बोलाविली.

 नगराध्यक्ष जोपर्यंत सभेचा अजेंडा काढत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार परंतु नगरपालिकेत जाण्यासाठी आम्ही कोणासही रोखणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने या बैठकीमध्ये मांडली, तर सभेचा अजेंडा यापूर्वीच तयार आहे तो दि. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा  काढणार आहे असा शब्द नगराध्यक्षांनी यावेळी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आंदोलनाची समाप्ती होऊन नगरपालिकेतील कामकाज पुन्हा शांततेत सुरू होईल असा अंदाज पोलीस प्रशासनासह सर्वांनी बांधला.

आज  दिनांक 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी व व मित्र पक्षाचे गटनेते, नगरसेवक नगरपालिकेत आले व त्यांनी आपले आंदोलन दिलेल्या शब्दाप्रमाणे चालू ठेवले. नगरपालिकेत जाण्यासाठी कोणालाही मज्जाव केला जात नव्हता. त्यामुळे नगरपालिकेतील कामकाज सुरळीत सुरू झाले मात्र बाहेर आंदोलनही सुरू अशी परिस्थिती पहावयास मिळाली. दरम्यान नगरपालिकेतील कामकाज सुरू करण्याच्या आंदोलनासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिकेत आले. या यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पो. निरीक्षक नारायण पवार यांनी त्यांना नगरपालिकेत नेऊन कामकाज सुरू झाले असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे पँथर सेनेला आंदोलन करावे लागले नाही. नगरपालिकेतील कामकाज सुरू झाल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.पँथर सेनेला कामकाज सुरू करण्यासाठी आंदोलनच करावे लागले नसल्याने त्या ठिकाणी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही व कामकाजही चालू राहिले.

 पोलीस प्रशासनाच्या बैठकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे नगराध्यक्ष यांनी आज सभेचा अजेंडा काढला व तो राष्ट्रवादीचे गटनेते, नगरसेवकांना देण्यात आला. राष्ट्रवादीने विषय सभेच्या अजेंडा मध्ये घेण्यासाठी जे विषय दिले होते त्या विषयांचा नगराध्यक्षांनी अजेंडया मध्ये समावेश केलेला नाही हे निदर्शनास आल्याने आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीने तो अजेंडा नाकारला व आपले आंदोलन यापुढे आणखीनच तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनामुळे कटारिया गट विरुद्ध राष्ट्रवादी -मित्र पक्षातील संघर्ष जास्तच पेटणार असल्याचे चित्र समोर येत आहे.