PMAY प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दौंड तालुक्यात पहिल्या टप्यातील 1486 घरकुलांना मंजुरी – आमदार राहुल कुल यांची माहिती



|सहकारनामा|

दौंड : (अब्बास शेख)

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील पहिल्या टप्यातील १४८६ घरकुलांना मंजुरी मिळाली असून घरकुलासाठी प्रति लाभार्थी 2लाख 50 हजार अनुदान प्राप्त होणार आहे . या अनुदानापैकी राज्य शासनाच्या हिश्याच्या प्रति लाभार्थी १ लाख रुपये अनुदानासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणास १४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून केंद्र शासनाच्या हिश्याचे प्रति लाभार्थी 1 लाख 50 हजार  अनुदान देखील पुणे महानगर विकास प्राधिकरणास लवकरच प्राप्त होणार आहे . या मंजूर लाभार्थ्यांना त्यांच्या कार्यारंभचा आदेश लवकरच देण्यात येणार असून घरकुलाच्या कामाच्या प्रगतीनुसार 2 लाख 50हजार रुपये अनुदान टप्याटप्याने देण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्यातील प्रकल्प अहवालास दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीची मंजुरी मिळून देखील विविध अडचणींमुळे निधी मिळण्यास विलंब होत होता, मंजुरी मिळालेल्या प्रकल्प अहवालातील लाभार्थ्यांना  राज्य व केंद्र शासनाचे अनुदान मिळावे यासाठी आमदार राहुल कुल यांनी राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव  मिलिंद म्हैसेकर , पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त  सुहास दिवसे  , पीएमएवाय म्हाडाचे कार्यकारी अभियंता  दिलीप मुगलीकर यांचे कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आत्ता या पाठपुराव्यास यश मिळत आहे.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे  २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुणे महानगर विकास प्राधिकरणा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दौंड तालुक्यातील 15000 नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यातील १८६२ प्रकरणांना मंजुरी मिळाली असून उर्वरित प्रकरणांच्या प्रकल्प अहवाला तयार करण्याचे तसेच सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे असल्याचेही आमदार राहुल कुल यांनी सांगीतले.

पुणे महानगर विकास प्राधिकरणामध्ये समावेश झाल्याने १ लक्ष ज्यादा अनुदान — आ. कुल

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण घरकुलासाठी प्रति लाभार्थी रुपये १.५ लक्ष अनुदान असून दौंड तालुक्यातील ५१ गावांचा पुणे महानगर विकास प्राधिकरणामध्ये समावेश झाल्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) घरकुलासाठी प्रति लाभार्थी रुपये २.५ लक्ष अनुदान लाभार्थ्यांना प्राप्त होणार असल्याचे ही आमदार कुल यांनी सांगीतले.