Daund Nagarpalika issue : दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या आंदोलनाची समाप्ती, उपनगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणार स्थायी सभा!



|सहकारनामा|

दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)

दौंडच्या नगराध्यक्षा मनमानी पणे कारभार करतात, नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही कोणतीही सभा घेत नाहीत, त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत, असा आरोप करीत नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी- शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या मनमानी कारभारा विरोधात दि  6 ऑगस्ट पासून नगरपालिका कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. आज दि. 17 ऑगस्ट रोजी त्याची समाप्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी स्थायी समितीची सभा घेण्याचे पत्र दिले असून दि. 20 ऑगस्ट रोजी उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे त्या सभेचा अजेंडा ही  आम्हाला मिळाला आहे तसेच विलास शितोळे यांनी स्थायी समिती सभा विषय पत्रिका कार्यालयास सादर केली आहे त्यानुसार शितोळे यांनी स्थायी समितीचे आयोजन केले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात यावे असे पत्र सुद्धा मुख्याधिकारी यांनी आम्हाला दिल्याने आज आंदोलनाची समाप्ती करीत आहोत असे बादशहा शेख यांनी सांगितले.

 उपमुख्यमंत्री  तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दौंड शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त असून देखील केवळ स्थायी समिती सभे अभावी विकास कामे राखडली होती. मागील सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष यांच्याकडे वारंवार सभा घेण्याची मागणी केली जात होती. परंतु त्यांचे वर्तन बेशिस्त व कर्तव्यात कसूर केल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी त्याची तातडीने दखल घेऊन स्थायी समिती ची सभा आयोजित करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून दिनांक 20 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सभा होणार आहे. 

स्वतःच्या हट्टापायी स्वतःवर नामुष्कीची वेळ नगराध्यक्ष यांच्यावर आली आहे, अखेर लोकशाहीचा विजय झाला असे ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख व इंद्रजीत जगदाळे म्हणाले. यावेळी पो. निरीक्षक नारायण पवार, राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.