82 मेंढ्या दगावलेल्या मेंढपाळ शेतकऱ्यास मदत मिळण्यासाठी आ.राहुल कुल यांचे पशुसंवर्धन मंत्र्यांना निवेदन

मुंबई : 

दौंड तालुक्यातील येथील मेंढपाळ, शेतकरी श्री. अंकुश रघुनाथ देवकाते यांचा १०० लहान मोठ्या जनावरांचा गोठा असून दि. ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व जनावरांना लाळ – खुरकत लसीचे लसीकरण केले होते. त्यानंतर गोठ्यातील सर्वच जनावरे जुलाबाने त्रस्त झाली व आजतागायत त्यातील सुमारे ८२ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

एक साधा शेतकरी आणि मेंढपाळ असणाऱ्या इसमाचे इतके मोठे नुकसान झाल्याने मेंढपाळ शेतकरी हवालदिल झाला होता. लॉकडाउन उठत नाही तोच त्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यावर आभाळच कोसळले होते. या शेतकऱ्याला मदत मिळावी आणि त्याची झालेली नुकसानभरपाई मिळण्याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. नामदार सुनीलजी केदार यांना निवेदन देऊन त्यांना मदत मिळणेबाबत यांनी मागणी केली.

आमदार कुल यांनी संबंधित शेतकऱ्यास मदत मिळण्याची मागणी करताच यासंदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना मा.मंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याने मेंढपाळ शेतकरी देवकाते यांना मदत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.