पुणे :
वकिलाला खोट्या केसमध्ये गुंतवून त्याला शिक्षा व्हावी या उद्देशाने दोन बहाद्दरांनी एक पिस्तुल गाडीत लपवून पोलीसांना खबर दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत चे सहा.पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 13/10/2021 रोजी सायंकाळी 05:00 वाजण्याच्या सुमारास कासुर्डी (ता.दौड जि.पुणे) या गावच्या हद्दीमध्ये पोलीस गाड्यांची चेकिंग करत असताना कार नं. एम.एच.12 आर.टी 8657 हि पोलीसांना आढळून आली आणि पोलीसांनी त्वरित ती बाजूला घेऊन तिची झडती घेण्यास सुरुवात केली. हा काय प्रकार आहे हे कार चालकांच्या लवकर लक्षात आला नाही, मात्र ज्यावेळी सत्य समजले त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
कारण या कारमध्ये एक पिस्तुल सापडले होते आणि तेही कारच्या बाहेरच्या बाजूने सायलेन्सर जवळ अटकविलेल्या स्थितीत. हे सर्व घडत असताना वकिलांना मात्र दरदरून घाम फुटला आणि यवत पोलीसांना या कारच्या पाठीमागील बाजुस एक पिस्तुल लटकवलेले असून त्या कारची झडती घेतल्यास ते पिस्तुल मिळून येईल अशी जी माहिती मिळाली होती तीही खरी निघाली. मात्र वकील भारत मांडे व त्यांची पत्नी स्नेहल भारत मांडे हे आपले पिस्तुल नसून आपण का आणि कशासाठी हे पिस्तुल जवळ बाळगू अशी नम्रपणे आपली बाजू पोलीसांसमोर मांडत होते. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्याचे सहकारी नागरगोजे हे ऐकून घेताना त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी गुप्त खबर देणार यांना विश्वासात घेऊन यवत पोलीस स्टेशन येथे पाचारण केले. त्यावेळी पोलिसांनी अतिशय चतुराईने तपास करून खबर देणार यांच्याकडून माहिती घेतली असता नवीनच कथा समोर आली. कारण ज्यांनी वकिलांच्या गाडीत पिस्तुल आहे अशी खबर दिली होती तेच या घटनेतील खरे आरोपी निघाले.
यातील आरोपी राहुल राजाराम रणदिवे व प्रसाद तानाजी अनपट (दोन्ही रा. इंदापुर जि.पुणे) यांनी त्यांच्या ओळखीच्या असणाऱ्या कुबेर नावाच्या इसमाकडून एक पिस्टल विकत घेऊन तो एका प्लास्टीकचे पिशवीत गुंडाळुन तो वकिलांच्या गाडीच्या सायलेन्सर जवळ तारेने बांधुन ठेवला होता. जेणेकरून वकील भारत मांडे व त्यांचे पत्नी स्नेहल भारत मांडे हे खोटया केसमध्ये गुंततील आणि त्यांच्या करिअरचे नुकसान होईल या उद्देशाने त्यांनी पोलीसांना खोटी माहीती पुरवुन, कट रचुन वकील आणि त्यांच्या पत्नीच्या विरूध्द खोटा पुरावा तयार करून हा सर्व बनाव केला होता.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर यवत चे सहा.पोलीसनिरीक्षक नागरगोजे यांनी 1) राहुल राजाराम रणदिवे (वय 30 वर्षे,रा.आठबायमळा ता.इंदापुर,जि.पुणे) 2) प्रसाद तानाजी अनपट (रा.इंदापुर,ता.इंदापुर,जि.पुणे) 3) कुबेर पुर्ण माहीत नाही (रा.कडा ता.आष्टी जि.बिड) यांचे विरूध्द सरकारतर्फे भा.द.वि.क.120(ब),177,182,192,193,195 भारतीय हत्याराचा कायदा कलम 3(1), 25 अन्वये फिर्याद दिली आहे.
हा गुन्हा नारायण पवार पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमंलदार सपोनी तावरे मॅडम यांनी दाखल करून घेतला आहे.