पुणे-सोलापूर महामार्गावर चोर, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये थरार… दुचाक्या चोरणारा 1 चोरटा गजाआड तर 2 फरार



|सहकारनामा|

दौंड :  पुणे -सोलापूर महामार्गावर, दुचाकीवर येऊन दुचाक्या चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग करीत एका चोराला दौंड पोलिसांनी जेरबंद केले. अमोल अशोक कुऱ्हाडे (रा. पोपळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,दि.18 ऑगस्ट रोजी रात्री रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस महामार्गावर गस्तीवर असताना वृंदावन हॉटेल समोरून मळद येथील महेंद्र रणवरे यांची दुचाकी चोरटे चोरून नेत असल्याची खबर मिळताच गस्तीवरील पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला व दुचाकीवरील तीन चोरांपैकी एकाला पकडले मात्र त्याचे दोन साथीदार फरार झाले. 

पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी परिसरामध्ये 15 ते 20 पोलीस व 100 ते 150 ग्रामस्थ चोरट्यांचा शोध घेत होते. चोरट्यांकडून दौंड पोलिसांनी तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीकडून चोरलेल्या आणखीन दुचाक्या मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाक्या चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाक्या हस्तगत करण्यासाठी दौंड पोलीस या महामार्गावर रात्रभर गस्तीवर असतात अशी माहिती ही पोलिसांनी दिली.