दौंड शुगर कारखान्याच्या व्यवहारांची आयकर विभागाकडून सलग 4 दिवस 12-12 तास तपासणी, तपासणी बाबत वीरधवल जगदाळे यांनी केला ‛मोठा’ खुलासा

दौंड :

आयकर विभागाच्या पथकाने सलग चार दिवस 12-12 तास काम करून दौंड शुगरच्या व्यवहारांची तपासणी केली, मात्र आमच्या दृष्टीने या पथकाला आक्षेपार्ह असे काहीच मिळालेले नाही असे दौंड शुगरचा कारभार पाहणारे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

राज्याचे उप. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातलगांच्या साखर कारखान्यांची आयकर विभागाच्या वतीने नुकतीच तपासणी करण्यात आली या पार्श्वभूमीवर वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर होत असलेल्या तपासणी बाबत माहिती दिली.

वीरधवल जगदाळे म्हणाले, आयकर विभागाच्या पथकाने विचारलेली संपूर्ण अत्यावश्यक माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे. कारवाई दरम्यान पथकाने कारखान्यातील साखर, इथेनॉल स्टॉकची पाहणी केली, कारखान्याचे स्टॉक रजिस्टर व त्यांनी केलेली मोजणी यात त्यांना कोणताही फरक सापडलेला नाही. या पथकाला अपेक्षित असलेली महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर काही माहितीसाठी थोडा अवधी मागण्यात आलेला आहे.

आमच्या दृष्टीने तरी त्यांना आक्षेप घेण्यासारखे काहीही मिळालेले नाही परंतु आता ते (पाहुणे) काय निष्कर्ष काढतात हे सांगता येत नाही. आमच्याकडून आयकर वेळेवर भरला जातो आहे, आजच्या तारखेला कारखान्याची माहिती लपून राहू शकत नाही व कोणी चालक लपवून ठेवू ही शकत नाही.

अजित दादांचे नातलग व दौंड शुगरचे अध्यक्ष जगदीश कदम यांचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. आता कोणाचे नातेवाईक होणे गुन्हा नाही, संपूर्ण कुटुंबीयांची माहिती आम्हाला विचारली गेली हा त्यांच्या तपासाचा एक भाग होता. दौंड शुगर कोण चालवतोय यापेक्षा कोणासाठी चालविला जातो आहे याचा विचार व्हायला पाहिजे. आज दौंड शुगर नसता तर येथील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप कोणी केले असते? कोणताही भेदभाव न करता सर्वच शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप दौंड शुगर कडून केले जाते. यावर्षीही 11 लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. आयकर विभागाच्या या तपासणीचा गळीत हंगामावर काहीच परिणाम होणार नाही असेही वीरधवल जगदाळे म्हणाले.