|सहकारनामा|
दौंड : कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अद्यापही दिसून येत आहे त्यामुळे त्याचा प्रसार शहरामध्ये आणखीन वाढू नये याकरिता दौंड मधील दहीहंडी उत्सव आयोजकांनी, युवकांनी आपल्या भावनांना आवर घालीत शहरामध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करू नये असे आवाहन दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दौंड पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी येथील दहीहंडी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यांचे समुपदेशन केले. कोरोना अजून संपूर्णपणे संपलेला नाही, अशा परिस्थितीत शहरामध्ये जर दहीहंडी उत्सव साजरा झाला तर त्याचा आपल्या कुटुंबासह सर्वच समाजाला त्याचा धोका उद्भवणार आहे. आपल्या उत्सवामुळे हे संकट कोणावरच येऊ नये याकरिता यंदा शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये असे आवाहन त्यांनी सर्व मंडळांना केले.
हिंदू एकता मंच (गांधी चौक), अभिमन्यू मित्र मंडळ (आंबेडकर चौक), आनंद पळसे मित्र मंडळ, मोरया ग्रुप (गोपाळवाडी रोड) या दहीहंडी उत्सव आयोजकांनी हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय बैठकीतच घेतला आहे. यावेळी हिंदू एकता मंच दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आयोजक शैलेंद्र पवार, वीरधवल जगदाळे युवा मंच चे अध्यक्ष उमेश जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी, दौंड ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र देसाई, दौंड शिवसेनेचे पदाधिकारी चांद बादशहा शेख आदि उपस्थित होते.