|सहकारनामा|
दौंड : भारतरत्न व नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित संत मदर तेरेसा यांची 111 वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मोजेस पॉल यांच्या पुढाकाराने व येथील संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. जयंती निमित्ताने शहरातील मदर तेरेसा चौकातील संत मदर तेरेसा यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगराध्यक्ष शितल कटारिया, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मा.उप नगराध्यक्ष अँथोनी फिलीप, ऍड. अमोल काळे, अश्विन वाघमारे, डॉमनिक पॅट्रिक, विनय खरात, हर्षद मनवर, रतन जाधव, विजय पवार, शाहिद शेख, अकबर शेख, सुभाष शिंदे, विनोद भालसेन, संतोष माने, दत्तू घोडे, पप्पू पेतरज, प्रवीण गरुडकर, राजू गरुडकर, चंद्रकांत लोंढे, गोविंद कांबळे, संजय जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याविषयी बोलताना पो. नी. विनोद घुगे म्हणाले, आपल्या भारतासाठी या माऊलीने खूप मोठे योगदान दिलेले आहे. या परदेशातून भारतात आल्या व येथील परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्यांनी स्वयम् प्रेरणेने येथील दुर्लक्षित रुग्णांची, लोकांची त्यांनी सेवा केली. त्यांच्या या सेवेमुळे त्यांना भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जगाने त्यांच्या कार्याची दखल घेत जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार हा सुद्धा त्यांना देण्यात आला. या माऊलीने जे काम केले ते आपण थोडे सुद्धा केले तर शहराची परिस्थिती सुधारेल. तेरेसा यांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि आपल्या वागण्यात बदल करावा हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल असेही घुगे म्हणाले. करोना मुळे कलाकारांची बिकट परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये त्या कलाकारांना वाद्य संच भेट देऊन आयोजकांनी एक चांगला सामाजिक उपक्रम राबविला, हे कौतुकास्पद आहे.
अखिल भारतीय कलाकार महासंघाचे दौंड शाखेचे अध्यक्ष भारत सरोदे व मा. नगरसेवक नागसेन धेंडे यांनीही संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. आयोजकांच्या वतीने ख्रिशचन समाज भजन मंडळ व अखिल भारतीय कलाकार संघाला वाद्य संच यावेळी भेट देण्यात आले.