बारामती : (सहकारनामा ऑनलाइन)
राज्याचे राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच चुरशीची होत चालली असून आता यामध्ये थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका सभासदाने सल्ला दिला आहे या सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे कारखाना निवडणूक आता चांगलीच चुरशीची होत असल्याचे दिसत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे. माळेगाव कारखाना ताब्यात घ्यायचा असा निर्धारच त्यांनी केला आहे. पण बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील ग्रामस्थ आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद असणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या भाषणात अजित पवारांची खिल्ली उडविली आहे.
नानासाहेब खलाटे असे या सभासदाचे नाव असून अजित पवारांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला असल्यामुळे संतापलेल्या या ऊस उत्पादक शेतकर्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीच्या जनतेने विरोधकाचे डिपॉझिट जप्त करून विधानसभेवर पाठवले आहे. त्यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष देऊ नये, असा सल्ला खलाटे यांनी थेट अजित पावरांनाच दिला आहे. अजित पवारांच्या भाजप सोबतीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे, नंतर राजीनामा दिल्याच्या घटनेवर ही ’अंधारात शपथविधी अन् दिवस उगवता राजीनामा’ अशा खुमासदार शैलीत या शेतकर्याने समाचार घेतला आहे. पवार मालक नसलेले वाघ आहेत…त्यांनी राज्यात सत्ता चालवावी. शेतकर्यांना ऊसाचे अधिक किंमत देणार्या कारखान्यात घुसू नये. आपल्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या ऊसाला चांगला भाव द्यावा मग बोलावे. अजित पवारांना ऊसाच्या फडात शिरलेल्या वाघ व बिबट्याची उपमा खलाटे यांनी दिली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाऩ्यासाठी रविवारी मतदान झाले असून त्या पार्श्वभूमीवर खलाटे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.