आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई



पुणे : सहकारनामा ऑनलाइन.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक व  आमदार अनिल भोसले यांना बँकेतील ७१ कोटी ७८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  त्यांच्यासह चार जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणात ९ जानेवारी रोजी १५ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सुर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या २०१८-१९ च्या आर्थिक वषार्चे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. या लेखापरिक्षणात ७१ कोटी ७८ लाख रुपयांची तफावत आढळून आली होती. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सीए योगेश लकडे यांच्या फियार्दीवरून अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसले यांच्यासह अन्य आरोपीने बँकेच्या अभिलेखमध्ये ७१ कोटी ७१ लाखांच्या केलेल्या बनावट नोंदी लेखपरिक्षणामध्ये उघड झाल्या होत्या.

रिझर्व्ह बँकेकडून २६ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आलेल्या विशेष तपासणीमध्ये कामकाजात अनियमितता असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांमुळे निर्बंध लादण्यात आले. संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासन नेमण्याचे आदेश देण़्यात आले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकाची नेमणूक केली होती.