दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणार : आमदार अॅड.राहुल कुल यांच्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उत्तर



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

– दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणेबाबत दौंडचे आमदार अॅड.राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या नंतर दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्यावेळी दिली.

याबाबत बोलताना आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले कि दौंड तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलुज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांची शेतीची सिंचन योजना या उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या नंतर तसेच उन्हाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा तुटवडा जाणवतो त्यामुळे त्या ठिकाणी बुडीत बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी एक समिती दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी समिती स्थापन करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके कधी पर्यंत सादर करणार व बंधाऱ्यांचे काम कधी पर्यंत पूर्ण करणार अश्या आशयाची मागणी केली तसेच उजनी धरणातील मृत साठा सुमारे ६३.६६ टीएमसी असून त्याचे फेर मुल्यांकन करून मृतसाठा व जिवंतसाठा याची मर्यादा किती ठरवायची याचा निर्णय घेणार का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले कि बुडीत बंधारे बांधणेबाबत समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या शिफारसीनुसार दौंड तालुक्यातील आवश्यक त्याठिकाणी बंधारे बांधनेबाबत कार्यावाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.