पुणे : सहकारनामा ऑनलाइन.
संपूर्ण जगामध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरस आता महाराष्ट्र राज्यातही पाय रोवू पाहत असून करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारनं सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहू शकतो अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे नागरिकांना आवाहन करताना त्यांनी लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका, लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोकच असावेत असे सांगत बंदचे आदेश पुढील ३१ मार्चपर्यंत नसून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले असल्याचे सांगून करोना बाबत केंद्राकडे निधी मागण्याची गरज नसल्याचे सांगून आपले राज्य त्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.