सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडे ठेवण्यास सरकारची सशर्त परवानगी



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

– जगाला भेडसावत असणाऱ्या कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव ओळखून या महामारीपासून स्वतःला वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकार विविध उपाययोजना आखत आहेत. याचाच एक भाग म्हणून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली मात्र नागरिक लॉकडाउनचा वेगळाच अर्थ लावून दुकानांमध्ये जास्तच गर्दी करू लागले आहेत. यावर उपाय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले आहे. त्यामुळे दुकानांमध्ये होणारी गर्दी आणि त्यामुळे वाढत असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



मात्र त्यांनी हे सर्व करताना नागरिकांनी दुकानदार आणि इतर ग्राहकांपासून ठरवून दिलेले अंतर पाळावे तसेच संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या

आरोग्याची काळजी घ्यावी, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याचे शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करण्यात यावे अशी शर्त ठेवण्यात आली आहे. वर्षा बंगल्यावर कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दुकाने २४ तास उघडी ठेवण्यावर चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. नागरिकांना जीवनावश्यक वस्तु, अन्न धान्य

खरेदी करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.