लॉकडाउन’चे आदेश मोडणाऱ्या 27 जणांवर ‛ड्रोन’च्या सहाय्याने गुन्हे दाखल, लॉकडाउन काळात ड्रोनद्वारे गुन्हे दाखल होण्याची राज्यातील पहिलीच घटना



पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

‛कोरोना विषाणूच्या’ संसर्गापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी केंद्रसरकारने तातडीने लॉकडाउनची घोषणा केली मात्र अनेकांनी या आदेशाला गंभीर न घेता सर्रास आदेशाची पायमल्ली केल्याने आता त्यांच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. 



पोलीस दिसले की लपून बसायचे आणि पोलीस गेले की पुन्हा मोकाट बाहेर फिरायचे असा उद्योग करणाऱ्या महाभागांच्या आता चांगलेच अंगलट आले आहे. कारण शासकीय आदेश मोडून मोकाट फिरणाऱ्या या महाभागांवर आता जमिनीवरून नव्हे तर थेट  आकाशातून ‛ड्रोन’द्वारे नजर ठेवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची घटना दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. बोरीऐंदी, केडगाव, वरवंड, पाटस, नाथाचीवाडी, खामगाव अश्या या सहा गावांची नावे असून या गावांतील सुमारे 27 युवकांवर भादवी कलम 188, 269 राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 चे कलम 51(ब) महाराष्ट्र कोवीड उपाययोजना 2020 चे कलम 11 ,साथीचा रोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील खंड 2,3,4 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती दिली असून नागरिकांनी आतातरी शासकीय नियम पाळून आपला आणि आपल्या परिवाराचा या संसर्गजन्य आजारापासून बचाव करावा असे आवाहन केले आहे.