‛त्या’ समाजातील लोकांकडून सामान खरेदी करू नका अशी पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल



भिगवण : सहकारनामा ऑनलाईन

– सध्या सोशल मीडियावर अफवांचे पीक जोर धरत आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत काही समाज कंटक सामाजिक वातावरण दूषित करू पाहत आहेत मात्र पोलीस आणि सायबरसेलही अश्या लोकांवर वॉच ठेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याने या समाज कंटकांचे धाबे दणाणले आहेत.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथेही काहीसा असाच प्रकार घडला असून या प्रकरणी भिगवण पोलिसांनी संतोष वासुदेव खडके (रा.भिगवण स्टेशन ता. इंदापूर) या तरुणावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन भादवी कलम 505(2),188. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 52, 54 साथरोग प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर युवकाने एका विशिष्ट समाजातील कोणत्याही लोकांकडून कसले सामान खरेदी करणे टाळावे अशा आशयाचा मेसेज एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून एका विशिष्ट समाजाविरुद्ध जनतेमध्ये सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे वर्तन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावरून भिगवण पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कुणीही कोणत्याही जाती धर्माचे लोकांवर निंदा नालस्ती करणारी चुकीची माहिती, अफवा पसरविणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. याबाबत पोलीस हवालदार वीर यांनी फिर्याद दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार काळे करीत आहेत.